Tuesday, May 13, 2025
गोंदिया

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय – जिल्हाधिकारी नयना गुंडे

 Advertisement
Advertisement

स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
गोंदिया : जिल्ह्यात शासन व प्रशासनाच्या वतीने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय व लोककल्याणकारी योजनांची योग्यरित्या अंमलबजावणी करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सर्वसामान्य नागरिकांचा विकास व जिल्ह्याची प्रगती हेच शासनाने व प्रशासनाचे ध्येय आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द होऊन जिल्हा अग्रेसर ठेवू या असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या मुख्य ध्वजारोहण समारंभात त्या बोलत होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे व विविध विभागाचे अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.
ज्या व्यापक लढ्यातून देशाने स्वातंत्र्य मिळविले, देशासाठी अनेक देशभक्तांनी आपले बलिदान दिले, त्या स्वातंत्र्याच्या इतिहासाला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे हे पर्व आहे. आपल्या मनात देशाप्रती अधिक कृतज्ञभाव निर्माण व्हावा हा यामागचा हेतू आहे. जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय उत्साहीपणे साजरा केला जात आहे. नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे व देशाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
जनहिताचे निर्णय घेऊन सर्वसामान्य जनता, शेतकरी व समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी राज्य शासन कार्य करीत आहे. नियमीत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय, पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय, अधिकाधिक जमीन सिंचनाखाली आणण्याचा तसेच प्रलंबीत प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत.
मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेती व अन्य बाबीचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टी ग्रस्तांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत करण्यात येणार आहे. ही मदत एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत असणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करणारी ‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंमलात आणली. जिल्ह्यातील 27 हजार 874 शेतकरी या योजनेसाठी पात्र झाले असून त्यापैकी 27 हजार 406 शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 110 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
जिल्ह्यात शासकीय आधारभुत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2021-22 मध्ये 107 धान खरेदी केंद्रामार्फत 1 लाख 20 हजार 323 शेतकऱ्यांकडून 35 लाख 56 हजार 790 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्यांची आधारभुत किंमत 690 कोटी रुपये आहे. शासनाकडून 690 कोटी रुपये प्राप्त झाले असून 689 कोटी 32 लक्ष रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले.
रब्बी हंगाम 2022 मध्ये 107 धान खरेदी केंद्रामार्फत 35 हजार 316 शेतकऱ्यांकडून 15 लाख 28 हजार 115 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. त्यांची आधारभुत किंमत 296 कोटी 45 लाख रुपये आहे. शासनाकडून धान खरेदीची संपूर्ण रक्कम प्राप्त झालेली असून आतापर्यंत 204 कोटी 92 लक्ष रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले.
सन 2021-22 मध्ये जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात 50 लाख 84 हजार 905 क्विंटल खरेदी झालेली असून राईस मिलर्सकडून 47 लाख 73 हजार 827 क्विंटल धानाची भरडाई करण्यात आलेली असून उर्वरित धानाची भरडाई सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात सन 2021-22 मध्ये 1 एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत एकूण 153 कोटी 11 लाख निधी खर्च झालेले असून त्यामधून 64 लाख 33 हजार मनुष्य दिवस निर्मिती झालेली आहे. या आर्थिक वर्षात 2 लाख 3 हजार 428 कुटूंबांना रोजगार पुरविण्यात आलेला आहे.
कोविड लसीचा व्हॅक्सीन अमृत महोत्सवही या निमित्ताने साजरा केला जात आहे. कोरोना महामारीचा संपूर्ण जगाला फटका बसला आहे. कोरोनावर लस हा एकमात्र उपाय असून जे नागरिक बुस्टर डोस घेण्यासाठी पात्र आहेत त्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन बुस्टर डोस घ्यावा. 30 सप्टेंबर पर्यंत सर्व नागरिकांना बुस्टर डोस मोफत देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.
कोविडमुळे पती गमावलेल्या 304 भगीनींना ‘मिशन वात्सल्य’ योजनेअंतर्गत विविध योजनांचे लाभ देण्यात येत आहेत. या भगीनींच्या पाठीशी प्रशासन भक्कमपणे उभे आहे. कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या 11 बालकांना 15 लाखांच्या पॅकेजचे वितरण करण्यात आले. यात 5 लाखाचे मुदत ठेव प्रमाणपत्र, वयाच्या 23 वर्षापर्यंत मासिक विद्यावेतन, आयुष्यमान भारत योजनेत पाच लाख रुपये विमा आदींचा समावेश आहे.
यासोबत जिल्ह्यात जिल्हा परिषद, कृषी विभाग, आरोग्य विभाग, वन विभाग, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, समाजकल्याण, आदिवासी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर सर्व विभागामार्फत सर्वसामान्यांच्या हिताचे व लोककल्याणकारी योजनांची योग्यरित्या अंमलबजावणी करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सर्वसामान्य नागरिकांचा विकास व जिल्ह्याची प्रगती हेच प्रशासनाचे ध्येय आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द होऊन जिल्हा अग्रेसर ठेवू या असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. उपस्थित पाहुण्यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली. ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मंजुश्री देशपांडे यांनी केले.

error: Content is protected !!