उद्योजक बनून आत्मनिर्भर व्हा; आ.मनोहर चंद्रिकापुरे यांचे जनजागृती मेळाव्यात प्रतिपादन
अर्जुनी-मोरगाव : घराबाहेर पडून उद्योजक व्हा. घराला हातभार लागेल. जीवनमान उंचावून कुटुंब सुखी होईल. उद्योग उभारणीमुळे वस्तू गावातच उपलब्ध होतील. संघर्ष केल्याशिवाय काहीच साध्य होत नाही. समर्पणाची भावना असली पाहिजे. सामुदायिक जाणिवेची जबाबदारी स्वीकारा. कामाला लागा. यशप्राप्ती निश्चितच होईल, असे प्रतिपादन आ.मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
ते खादी व ग्रामोद्योग आयोग नागपूर तसेच आ.मनोहर चंद्रिकापुरे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी स्थानिक प्रसन्न सभागृहात आयोजित प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम अंतर्गत जनजागृती मेळाव्यात बोलत होते.
या वेळी नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, नागपूर खादी व ग्रामोद्योग आयोगाचे निदेशक राघवेंद्र महिंद्रकर, सहनिदेशक आर एम खोडके, पंस सदस्य पुष्पलता द्रुगकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक उद्धव मेहंदळे, प्रमोद लांजेवार, खादी ग्रामोद्योगचे कनिष्ठ कार्यकारी भावेश शहारे, विजय शहारे, उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक रेशीम नेवारे उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, ग्रामीण भागात उद्योगाचे जाळे विस्तीर्ण झाल्यास उत्पादित वस्तू गावातच मिळू लागतील. १०० बचतगटांनी पुढे यावे, आपण त्यांना एक कोटींवरील प्रकल्प उभे करण्यासाठी सहकार्य करू. यासाठी बचतगट सक्षम असले पाहिजे. ग्रामीण भागात चर्चा, संवाद व मार्गदर्शनाच्या अभावामुळे उद्योगधंद्यांना चालना मिळत नसल्याचे ते म्हणाले.
महिंद्रकर म्हणाले, ग्रामिणांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागील मुख्य हेतू आहे. हा परिसर जंगलाने व्यापलेला आहे. येथे शेती, मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. येथे उद्योगाला बराच वाव आहे. डोक्याच्या मेंदूला चालना द्या. योग्य उद्योगधंद्यांची निवड करा. उद्योजक बना. आपण सहकार्य करू असे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन मंजुषा चंद्रिकापुरे यांनी केले. उपस्थितांचे आभार उद्धव मेहंदळे यांनी मानले.