रा.से .यो. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती कर्तव्याची जाणीव निर्माण होते – निशांत राऊत
सडक अर्जुनी – महाविद्यालयीन जीवनात शाळे व्यतिरिक्त विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागृती निर्माण करण्यासोबतच स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, वेसन मुक्ती, अशा विविध गोष्टीची विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण करून, त्यांच्यामध्ये सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन केले जाते. त्यामुळे शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या कर्तव्याची जाणीव निर्माण होते. असे प्रतिपादन युवक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य निशांत राऊत यांनी केले.
सडक अर्जुनी तालुक्यातील केसलवाडा येथे मनोहरभाई पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सडक अर्जुनी च्या वतीने आयोजित सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य आलोक द्विवेदी यांच्या मार्गदर्शनात सात दिवसीय शिबिराचे आयोजन केसलवाडा येथे करण्यात आले असून शिबिराचे उद्घाटन गोंदिया जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष निशांत राऊत यांच्या शुभहस्ते फीत काटून करण्यात आले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार बिरला गणवीर होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य सुलोचना मुनिस्वर, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमिला मरसकोले, डॉ. चंद्रकांत बिसेन, डॉ. सुनील आकरे, डॉ. वीरेंद्र सांगोडे, प्राध्यापक संदीप गाहाने, प्रा. रामदास हुसे, प्राध्यापिका विशाखा वाघ, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बिरला गणवीर यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच स्वतःच्या व्यक्तिमत्व विकास कसा घडविता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे असून वेळेचे नियोजन करून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्राध्यापक निलेश गोरघाटे यांनी तर आभार प्राध्यापक अश्विन पाटील यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे कर्मचारी अभय नागपुरे, लोकेश ठाकरे, सुखचंद कोकोळे, सुनील चाचरे, गणेश मडावी, विकास शेंडे यांनी सहकार्य केले.