सडक अर्जुनी चा आठवडी बाजार भरतो, भर चिखलात आणि बाजारातील नागरिकांना नगरपंचायत चा बसतो मुका मार..!
सडक अर्जुनी -( संपादकीय – डॉ.सुशील लाडे )- 22जुलै 2023- “मला पाहा आणि फुले वाहा” म्हणमारी नगर पंचायत सडक अर्जुनी ची बातच खूप निराळी आहे. सतत या ना त्या कारणावरून चर्चेत राहणारी सडक अर्जुनी नगरपंचायत रोज नवे विक्रम करीत असते. नगरपंचायत आणि तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या सडक अर्जुनी येथे आठवडी बाजाराची वाणवा आहे. येथे भरणारा आठवडी बाजार कित्येक वर्षापासून चिखलाच्या साम्राज्यात भरीत आहे. शहरासारख्या ठिकाणी आठवडी बाजार चिखलात भरतो ही लाजिरवाणी बाब आहे. नागरिकांत चर्चेचा विषय आहे की, माल सुताव अभियाना अंतर्गत केवळ कमिशन खोरीच्या नादात असणारे पदाधिकारी आणि अधिकारी यांना काही सोयरसुतक नाही.

सडक अर्जुनी नगरामध्ये अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. 2015 ला ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. नगरपंचायतचा थेट राज्य शासनाची संपर्क येतो. भरपूर प्रमाणात नगरपंचायतींना निधी मिळतो. तालुक्याचे ठिकाण म्हणून ओळख असलेले सडक अर्जुनी शहर विकासाच्या प्रतीक्षेत होते. नगरपंचायत झाल्याने शहराचा कायापालट होईल अशी आशा नागरिकांना होती.आठ वर्षे लोटली मात्र नागरिकांचा भ्रमनिरास सुरू आहे.सतत चर्चेत राहणारी नगरपंचायत सध्या बाजार चौक चिखलाच्या साम्राज्याने चर्चेचा विषय बनली आहे. कित्येक वर्षापासून बाजार चौकातील नागरिकांना सुख सुविधांचा अभाव आहे. एक दिवसाचा बाजार करणारे नागरिक चीखला मुळे अगर त्रासत असतील तर 60 ते 70 वर्षा पासून ह्या वस्ति मध्ये राहणाऱ्या नागरिकांचे काय हाल होत असतील याची कल्पना नगरपंचायतच्या अधिकारी आणि पदाधिकारी यांना नसेल काय ?
शहराचा विकासात्मक सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करून नागरिकांना उत्तम सुविधा देणे नगरपंचायतचे कर्तव्य आहे. मात्र शनिवारला भरणारा आठवडी बाजार मूलभूत सुविधांच्या अभावी भरवीला जातो. सडक अर्जुनी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे लागून असलेल्या गावा जवळील व्यापारी, नागरिक मोठ्या प्रमाणत आपले दुकाने लावत असतात. मुख्य म्हणजे शेंडा मार्गावर हा आठवडी बाजार भरीत असतो. सर्वच शासकीय कार्यालय ह्या मार्गावर आहेत. कित्येक वर्षापासून येथे आठवडी बाजार लागत असतो. पावसाळ्यात मात्र मोठ्या प्रमाणत संपूर्ण बाजार हा चिखलात भरीत असतो.
नागरिकांना चिखलातून मार्ग काढीत खरेदी करावी लागते. चिखलात घसरून पडण्याची भीती ग्राहकांना असते. मजबुरीपोटी दुकानदार आणि ग्राहक नगरपंचायतच्या गलथान कारभाराचा मुकामार सहन करीत आहेत. वास्तविक पाहता मागील कालावधीत या ठिकाणी लाखो रुपयांचे रस्त्याचे खडीकरण आणि नाली बांधकाम झाले होते. मात्र आता पावसाने खडीकरण उखडून पडले आणि चिखल निर्माण झाले .
नगरपंचायत मात्र लाखो रुपयांत बाजाराचे लिलाव करून मोकळे होत असते. परंतु बाजारात दुकान लावणाऱ्या दुकानदारांना मात्र कोणत्याही स्वरूपाची सुविधा पुरविली जात नाही. त्यांना चिखलात दुकान थाटावी लागतात. या परिसरात चिखल घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठी तारेची कसरत करावी लागते. चिखलात पाय घसरून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची असते. बाजार लिलाव करून मोकळे होणे एवढीच जबाबदारी नगरपंचायत बजावत आहे. नगरपंचायतींना शासनाकडून भरपूर निधी मिळतो पण काहीही न करता “तेरी भी चूप, मेरी भी चूप” चा प्रकार सुरू असल्याची चर्चा नागरिकांत जोर धरू लागली आहे.
” बाजार चौक येथील ठिकाणी खडीकरण झालेल्या ठिकाणीं सिमेंट रस्ता मंजूर झाला असून पावसामुळे काम थांबला आहे. लवकरच रोडचे काम सुरू करण्यात येईल आणि गट्टू पण लावले जातील ”
तेजराम मडावी नगराध्यक्ष नगर पंचायत सडक अर्जुनी