शिक्षण सेवक पदावर कार्य केलेल्या शिक्षकांना शिक्षण सेवक काळातील तीन काल्पनिक वेतन वाढी द्या – किशोर बावनकर यांचे बावळकुळेना निवेदन
शिक्षण सेवक पदावर कार्य केलेल्या शिक्षकांना शिक्षण सेवक काळातील तीन काल्पनिक वेतन वाढी द्या.
गोंदिया – भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाचे जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांचे निवेदन.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या निवेदनानुसार भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री व शिक्षण मंत्री यांना लिहिले तात्काळ पत्र.
शासनाच्या शिक्षण सेवक योजनेचा विरोध न करता शिक्षण कालावधीतील तीन काल्पनिक वेतन वाढी देऊन मानधनावर कार्य करणाऱ्या व मानधनावर कार्य न करणाऱ्या सहाय्यक शिक्षकांमध्ये समानता आणण्यासाठी शिक्षण सेवक कालावधीतील तीन वेतनवाढी देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाचे जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांनी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देवून मागणी केली आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यात शिक्षणावर मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेल्या खर्चाचा विचार करून शिक्षण सेवक योजना 27 एप्रिल 2004 शासन निर्णयानुसार सुरू केली. त्यानुसार सहाय्यक शिक्षकांच्या रिक्त जागेवरच शिक्षण सेवकांची नियुक्ती करण्यात येऊन सहाय्यक शिक्षकांच्या मंजूर लेखाशीर्षाखालीच खर्च करण्याचे आदेश शासनाने दिले. शिक्षण सेवक म्हणून केलेली सेवा सेवानिवृत्ती वेतन व सेवानिवृत्तीनंतरच्या इतर देय लाभासाठी ग्राह्य धरण्याचे शासनाने निर्देश दिले. शिक्षण सेवक कालावधी अर्हताकारी सेवा म्हणून गणण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. शिक्षण सेवक कालावधीतील तीन वर्षाच्या समाधानकारक सेवेनंतर सहाय्यक शिक्षक पदावर नियमित करण्यात आले. शिक्षण सेवक पदावर कार्य करताना सहाय्यक शिक्षकांची सर्व कार्य कर्तव्य व जबाबदारी पूर्ण करून घेण्यात आली. परंतु शिक्षण सेवक कालावधीमध्ये इतर कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ देण्यात आला नाही.
सहाय्यक शिक्षकांच्या रिक्त जागेवर शिक्षण सेवकांची नियुक्ती करताना गुणवत्ताधारक पात्र विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली. घटनेनुसार ठरलेल्या सामाजिक आरक्षणा नुसार नियुक्ती सुद्धा देण्यात आल्या. शिक्षण सेवकांच्या नियुक्ती शासन निर्णयावर सामाजिक आरक्षणाचा आधार घेऊनच करण्यात आलेल्या असल्याने शिक्षण सेवक पदावर कार्य केलेल्या सर्व शिक्षकांना शिक्षण सेवक कालावधीतील तीन काल्पनिक वेतन वाढी घेण्याचा हक्क आहे.
शिक्षण सेवक पदावर नियुक्ती होऊन सहाय्यक शिक्षक पदावर नियमित झालेल्या सहाय्यक शिक्षकांना बारा वर्षाच्या अर्हताकारी सेवेनंतर वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्यात येतो. परंतु नियमित कर्मचारी म्हणून नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 12 वेतनवाढी मिळाल्यानंतरच वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होते. परंतु शिक्षण सेवक पदावर कार्य केलेल्या सहाय्यक शिक्षकांना फक्त नऊ वेतन वाढी मिळाल्यानंतरच वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होते. हा शिक्षण सेवक पदावर कार्य केलेल्या सहाय्यक शिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला शिक्षण सेवक कालावधीतील तीन काल्पनिक वेतन वाढी देण्याचे पत्र सादर करण्यात आले.
शिक्षण सेवक सारख्या अन्य कोणत्याही मानधनावर सेवा न दिलेल्या म्हणजेच तीन वर्षे मानधनावर सेवा न देता नियमित कर्मचारी म्हणून सेवा दिलेल्या व समान वेतनश्रेणी असलेल्या कर्मचाऱ्यांना तीन वेतनवाढी जास्त मिळतात. त्यामुळे शिक्षण सेवक सारख्या मानधनावर सेवा देणारे कर्मचाऱ्यांना तीन वेतन वाढी कमी मिळने हा शिक्षण सेवक पदावर कार्य केलेल्या सहाय्यक शिक्षकांवरील अन्याय आहे.समान वेतन श्रेणी मध्ये एकाच वेळी शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन सारखे असले पाहिजे. मानधनावर कार्य केलेल्या व मानधनावर कार्य न केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये शासनाकडून होणारा भेदभाव तात्काळ दूर करून शिक्षण सेवक पदावर कार्य केलेल्या सहाय्यक शिक्षकांना महाराष्ट्र शासन नक्की न्याय देईल असा सूर सर्व शिक्षकांमध्ये निर्माण झालेला आहे.
महाराष्ट्र शासन यावर नक्कीच सकारात्मक विचार करून न्याय देईल अशी आशा सुद्धा किशोर बावनकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाने महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारची मागणी करून शिक्षण सेवक म्हणून कार्य केलेल्या सहाय्यक शिक्षकांवरील होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडल्यामुळे सर्व शिक्षकांमध्ये न्याय मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे त्यामुळे सर्व शिक्षक बंधू भगिनींकडून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कौतुक होत आहे.
किशोर बावनकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदिया यांनी मा.चंद्रशेखर बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्ष यांनी शासनाला तात्काळ पत्र लिहून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या निवेदनावर तात्काळ कार्यवाही केल्यामुळे साहेबांचे आभार मानले.