Monday, May 12, 2025
सड़क अर्जुनी

माजी मंत्री बडोले यांना आदिवासी गोवारी समाजाने दिले निवेदन , मोदी आवास योजनेचा टार्गेट वाढवुन द्या

सडक अर्जुनी – मोदी आवास योजनेमध्ये हा समाज समाविष्ट करण्यात आला असला तरी घरकुल वाटपाचा कोटा अत्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे गोवारी समाजाला मोदी आवास योजनेचा वाढीव कोटा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील गोवारी समाज संघटनेने केला असून या आशयाचे निवेदन माजी मंत्री राजकुमार बडोले यांना ता. १ जुलै रोजी जनसंपर्क कार्यालयात देण्यात आले.

आदिवासी गोवारी समाज पारंपारिक गुरेढोरे राखणारा आहे. या समाजाची आर्थिक व शैक्षणिक व सामाजिक प्रगती खुंटलेली आहे .पूर्व विदर्भात हा समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यातही गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गोवारी बांधव वास्तव्य करीत आहेत. हा समाज शासनाच्या विविध योजना पासून सुद्धा वंचित राहिलेला आहे.

गोवारी समाजाला मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुलांचे उद्दिष्ट वाढविण्याच्या संदर्भात गोवारी समाजाचे कार्यकर्ते गोरेलाल कुसराम, आणि सडक अर्जुनी चे उपसभापती शालिंदर कापगते यांच्या नेतृत्वात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र अंतर्गत गोरेगाव तालुक्यातील गोवारी समाज बांधव यांनी माजी मंत्री राजकुमार बडोले यांना निवेदन दिले.

माजी मंत्री बडोले साहेबांनी त्वरित बहुजन विकास मंत्री नामदार अतुल सावे यांना फोन लावला व गोवारी समाजाचा मोदी आवास योजनेचे उद्दिष्ट वाढविण्यासंदर्भात चर्चा केली. मंत्री महोदय यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत मधून ग्रामसभेचा ठराव घेऊन उद्दिष्ट वाढविण्याच्या बाबतीत पंचायत समितीच्या मार्फत प्रस्ताव देण्याच्या बाबतीत सुचना दिल्या, ग्रामपंचायतींना मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल वाटून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. या शिष्टमंडळात उपसभापती शालींदर कापगते, गोरेलाल कुसराम, व्यंकट कोहळे, परसराम चामलाटे, नीलकंठ कवरे ,बिरजलाल कुसराम व अन्य समाज बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!