Wednesday, May 14, 2025
गोंदिया

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एकही पात्र लाभार्थी सुटता कामा नये – जिल्हाधिकारी प्रजित नायर

• नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून करा अर्ज

गोंदिया दि.12 : “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” ही शासनाची महत्वाकांक्षी लोककल्याणकारी योजना असून या योजनेत पात्र होणाऱ्या प्रत्येक स्त्रीची नोंदणी करण्याची महत्वाची जबाबदारी सर्व संबंधितांची आहे. एकही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले. आज मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली योजनेचा आढावा घेण्यात आल्यानंतर त्यांनी सर्व यंत्रणांना मार्गदर्शन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. आता “नारी शक्ती दूत” ॲपच्या माध्यमातून सामान्य महिला देखील अर्ज भरू शकते. ॲपमध्ये अर्ज भरताना अडचण आल्यास नजीकच्या अंगणवाडी केंद्रात देखील अर्ज भरून द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांकडून प्रविष्ट केला जाईल आणि दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य राहील.

सुधारित शासन निर्णयानुसार या योजनेत आता 21 ते 65 वयोगटातील मुली व महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्याची नोंदणी 31 ऑगस्ट पर्यंत होणार आहे. त्यामुळे मुली व महिलांनी नोंदणीसाठी गर्दी न करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

“मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेचा अर्ज भरण्यासाठी किंवा या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या असामाजिक तत्त्वांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.

पात्र महिलेस आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात रक्कम दिली जाईल. 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या आणि निराधार महिला कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला लाभासाठी पात्र असेल.

error: Content is protected !!