कारगिलमध्ये शहीद झालेल्यांचे बलिदान देश विसरणार नाही- जिल्हाधिकारी गोंदिया
गोंदिया, दि.29 : कारगिल युध्दात शहीद झालेल्या सैनिकांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात 26 जुलै 2024 रोजी पंचवीसव्या कारगिल विजय दिनानिमीत्त माजी सैनिक मेळावा साजरा करण्यात आला, त्यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मानसी पाटील, उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे व किरण आंबेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक मनोहर अनचुळे, पोलीस उपअधीक्षक नंदिनी चानपूरकर, सहायक मोटर वाहन निरीक्षक किशोर नागदेवे, सैन्य सेवारत अधिकारी मेजर राजेश ठाकरे उपस्थित होते.
प्रारंभी द्वीप प्रज्वलन करुन तसेच जिल्ह्यातील शहीद सैनिकांना पुष्पांजली अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित वीरपत्नी आणि वीरमाता यांचा पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मानसी पाटील यांनी उपस्थित वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक, माजी सैनिकांचे अवलंबीत यांना सैनिक कल्याण कार्यालयाकडून लागू असलेल्या सर्व कल्याणकारी सुविधांबद्दल जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन केले. मातृभूमी माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था पुणे यांचे प्रतिनिधी प्रभाकर पुस्तोडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सैन्यदलात जास्तीत जास्त प्रमाणात प्रवेश घेण्याकरीता प्रोत्साहीत केले.
शहीद जान्या-तिम्या जि.प.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव आणि जि.प.हायस्कूल हलबीटोला येथील विद्यार्थ्यांनी देशाचे सैनिक देशाचे सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी स्वत:चे सर्वोच्च बलिदान देतात याविषयी सादरीकरण करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी सैनिक गणेश बिसेन यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक धनराज बावनथडे यांनी मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक, माजी सैनिकांचे अवलंबीत, मनोहरभाई पटेल मिलिट्री स्कुल गोंदिया, शहीद जान्या-तिम्या जि.प.हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव, जे.एम.हायस्कुल गोंदिया व जि.प.हायस्कुल हलबीटोला येथील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते शहिदांच्या आठवणीत वृक्षारोपण करण्यात आले.