बदलापूर प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या : जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम
गोंदिया : बदलापूर येथे शाळेत गेलेल्या २ अल्पवयीन बालिकेंवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना शाळेतच घडली. ही घटना अल्पवयीन बालिकांनी कुटुंबीयांना सांगताच कुटुंबांनी या घटनेची तक्रार पोलिसांकडे करायला गेल्यावर पोलिसांनी जवळपास १२ तास पीडित बालकेच्या कुटुंबीयांना तात्कळत बसवून ठेवले आणि तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करीत या प्रकरणातील आरोपींना शोधून फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी २४ ऑगस्ट रोजी गोंदिया जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी केली आहे.
सविस्तर असे की, बदलापूर येथे शाळेत गेलेला अल्पवयीन दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. ही घटना उघडकीस येताच बहुसंख्य सामाजिक व राजकीय संघटनांनी या घटनेचा निषेध व्यक्त करीत आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, ही घटना अतिशय संवेदनशील असून यासारख्या घटना टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र २३ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिल्याने महाराष्ट्र बंद स्थगित करण्यात आला. केवळ बदलापुरातच नव्हे तर या प्रकारच्या अमानविय घटना महाराष्ट्रात ठिक ठिकाणी घडत आहेत.
तथापि, शासनाकडून महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांचा मोठ्या प्रमाणात कांगावा केला जात असला तरी दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. राज्यात गुन्हेगारीची संख्या वाढली आहे. राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या संपूर्ण घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व बदलापूर प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी केली आहे.