Monday, May 12, 2025
सड़क अर्जुनी

जि.प.शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी पंचायत समिति कार्यालयापुठे मांडला ठीया आंदोलन

सडक निर्माण :यावे ज्ञानासाठी व निघावे सेवेसाठी असे ब्रीदवाक्य असलेल्या शिक्षण विभागाने पहिली ते चौथी पर्यंतच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानर्जणाची सोय करण्यासाठी शिक्षकांची सोय न केल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी चक्क बैलपोळ्याच्या दिवशी पंचायत समिती कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन केल्याची घटना घडली. ही घटना २ सप्टेंबर रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील चिचटोला येथे घडली. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाने पाठिंबा दर्शविला असून शाळेत तात्काळ शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.

सविस्तर असे की, सडक अर्जुनी तालुक्यातील चिचटोला येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग भरत असून जवळपास ३७ विद्यार्थी पटसंख्या आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानर्जणाचे धडे गिरविण्यासाठी एक मुख्याध्यापक व एक शिक्षक अशा एकुण दोघांची नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, २० ऑगस्ट रोजी एका शिक्षकाचे स्थानांतरण झाल्याने त्यांनी शाळा सोडली तर ३१ ऑगस्ट रोजी शाळेचे मुख्याध्यापक वयोमानानुसार निवृत्त झाले आहेत. शाळेत कार्यरत दोन्ही शिक्षक निवृत्त झाल्याने ३७ विद्यार्थी पटसंख्या असलेली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा शिक्षकांविना पोरकी झाली आहे.

तथापि, २ सप्टेंबर रोजी बैलपोळ्याच्या दिवशी सकाळ पाळीत शाळा आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार गावातील विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली होती. विद्यार्थी शाळेत पोहोचले मात्र कोणताही शिक्षक शाळेत न आल्याने विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. विद्यार्थ्यांनी या घटनेची माहिती पालकांना दिली. पालकांसह विद्यार्थ्यांनी जवळपास ९ वाजता पर्यंत शाळेत शिक्षकांची वाट पाहिली मात्र शाळेत शिक्षक उपलब्ध न झाल्याने त्यांनी पंचायत समिती कार्यालय गाठीत ठिय्या आंदोलन सुरू केले.

विशेष म्हणजे चिचटोला मधील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेला २००७ मध्ये आदर्श पुरस्कार मिळाला होता. तर २००९ मध्ये साने गुरुजी पुरस्कार मिळाला आहे तर क्रीडा विभागात सतत १० वर्षे ही शाळा अव्वल ठरली असून या शाळेकडे शिक्षण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाने ही शाळा शिक्षकांअभावी पोरकी झाली आहे.

याप्रकरणी शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या शाळेत तात्काळ शिक्षक उपलब्ध करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी केली आहे.

प्रतिक्रीया :
“इथले स्थानिक लोकप्रतिनिधी निद्रा अवस्थेत आहेत त्यांना चिमुकल्या मुलांची कुठली काळजी नाही शाळेत शिक्षक नाही याकडे लक्ष नाही फक्त ठेकेदारांचे पोट भरण्याकडे त्यांचे लक्ष आहे .पहिली ते आठवी पर्यंतचे शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले परंतु शिक्षकच नाही अशी परिस्थिती झालेली आहे.” मिथुन मेश्राम जिल्हा कार्याध्यक्ष

error: Content is protected !!