Monday, May 12, 2025
अर्जुनी मोर

अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या – कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम

अर्जुनी मोरगाव :    ९ व १० सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजूनही काही शेतातील पुराचे पाणी निघाले नसून शेत पिके पाण्याखाली डुबून आहेत. या स्थितीत महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी केली आहे.

सविस्तर असे की, गोंदिया जिल्हा हा भाताचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या मालकी शेतात धान पिकाची लागवड केली आहे. धान पीक लागवडी अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांनी लागवडी खर्चासह विविध खतांची व औषधांची फवारणी केली आहे. सध्या धानपिक गर्भावस्थेक असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

तथापि, ९ व १० सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाने जिल्ह्यातील नदी, नाले व ओढ्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. नदी, नाले व ओढ्यांच्या काठावर असलेल्या शेतात अजूनही पाणी जण असल्याने शेत पिके पाण्याखाली डुबून आहेत. तथापि, गोंदिया जिल्ह्यात आलेल्या मुसळधार पावसाने गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांची शेत पिके नष्ट झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

याप्रकरणी शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून पीडित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी केली आहे.

error: Content is protected !!