Tuesday, May 13, 2025
गोंदिया

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व केटीएस रुग्णालय येथे तंबाखू नशा मुक्ती केंद्राचे उद्घाटन

गोंदिया, दि.4 : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय स्तरावर तंबाखूमुक्त युवा अभियान २.० यांची सुरुवात २४ सप्टेबर २०२४ पासून करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय स्तरावर सदर कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आयुष मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय श्री. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. येणारी पीढी व्यसनमुक्त होण्याकरीता गावापासुन व्यसनमुक्तीची सुरुवात झाली पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत युवकांना तंबाखू व इतर व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी हे अभियान दोन महिने राबविण्यात येणार आहे. सदर अभियानाचे औचित्य साधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व केटीएस रुग्णालय येथे तंबाखुमुक्त केंद्राचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्या हस्ते २४ सप्टेबर २०२४ रोजी करण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करतांना अधिष्ठाता यांनी तंबाखुमुळे होणारे दुष्परिणाम तसेच आपली युवा पिढी तंबाखू व इतर अंमली पदार्थांच्या आहारी न जाता जीवनात योग्य मार्गाने परीश्रम केल्यास खूप काही अर्जित करु शकते यावर मार्गदर्शन केले. तसेच शासनाव्दारे सुरु करण्यात आलेल्या सदर अभियानामुळे जनतेला होणाऱ्या फायद्यांबद्दल अधिष्ठाता यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

तंबाखुमुक्ती केंद्रामधे तंबाखू, सिगारेट, बिडी, खैनी, गुटखा अशा व्यसनांच्या अहारी गेलेल्या आणि त्या सोडू इच्छिणाऱ्या व्यक्तींचे येथे समुपदेशन क्लिनीकल सायकोलॉजिस्ट द्वारे करण्यात येणार आहे. याशिवाय त्यांचा मानसोपचारतज्ञ औषधे देऊन पूर्ण उपचारही करतील. जेणेकरुन सदर व्यसनाधीन व्यक्ती निरोगी आयुष्य व्यतीत करु शकेल.

कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील उप अधिष्ठाता व प्राध्यापक न्यायवैद्यकशास्त्र विभाग डॉ.विपुल अंबाडे, वैद्यकिय अधिक्षक डॉ.दिगंबर मरसकोल्हे, प्राध्यापक जन औषधवैद्यकशात्र डॉ. प्रशांत बागडे, प्राध्यापक बालरोगशास्त्र विभाग डॉ.लीना धांडे, प्राध्यापक दंतशास्त्र विभाग डॉ.प्रियतमा मेश्राम, सहयोगी प्राध्यापक डॉ.अमित जोगदंडे, सहयोगी प्राध्यापक डॉ.पवन मेश्राम, डॉ. अभय आंबिलकर, डॉ.अश्विनी डोंगरे, डॉ.स्नेहा शर्मा, डॉ.मनू शर्मा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सहाय्यक प्राध्यापक जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग डॉ.राजेश कटरे, डॉ.राठोड, डॉ.अनंत चांदेकर, मारोती कुचनकर, सचिन ढोले, सायकोलॉजिस्ट सुरेखाआजाद मेश्राम यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!