धापेवाडा उपसा सिंचन टप्पा 2 चे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते संपन्न
*धापेवाडा उपसा सिंचन टप्पा 2 चे भूमिपूजन
*5 हजार 217 कोटींचा विकास कामांना मंजुरी
गोंदिया, दि.13 : धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पामुळे 75 हजार एकर जमीन ओलिताखाली येणार असून या प्रकल्पामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. सदर काम पूर्ण झाल्यानंतर तिरोडा गोरेगाव क्षेत्रातील शेती सुजलाम सुफलाम होईल व सामान्य शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
तिरोडा-गोरेगांव विधानसभा क्षेत्रातील धापेवाडा उपसा सिंचन योजना प्रकल्प टप्पा-2 व तिरोडा नगर परिषद व गोरेगांव नगर पंचायत क्षेत्रातील विकासकामांचे भूमिपूजन व जलपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहीद मिश्रा विद्यालय, तिरोडा येथील पटांगणावर आयोजीत करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी विधान परिषद आमदार डॉ.परिणय फुके, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, आमदार तिरोडा-गोरेगांव विधानसभा क्षेत्र विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधिक्षक गोरख भामरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरूगनंथम तसचे विविध पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा 2 हा प्रकल्प गोंदिया जिल्हयातील तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा गावाजवळ वैनगंगा नदीवर असून गोंदिया जिल्हयातील तिरोडा, गोरेगाव, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी या तालुक्यातील 214 गावातील एकूण 80726 हेक्टर व भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, लाखांदुर व साकोली या 3 तालुक्यातील 20 गावातील 9420 हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.
या प्रकल्पाचे काम पुर्ण झाल्यानंतर गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील 15 तलावांमध्ये पाणी भरणा करुन अतिरीक्त 66170 हेक्टर व एकुण 90146 हेक्टर सिंचन क्षमता निर्मित होणार आहे. त्यामुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील एकुण 234 गावांतील जवळपास 1 लक्ष 58 हजार शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाच्या कामाची व्याप्ती लक्षात घेता प्रकल्पाच्या कामाची चार चरणात विभागणी करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत नगर परिषद तिरोडा शहराकरीता मलनिस्सारण प्रकल्प व गोरेगांव नगर पंचायतचा पाणी पुरवठा प्रकल्पाची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पायाभरणी करण्यात आली.