बुद्धगया मुक्तीसाठी दीक्षाभूमीपासून “धम्मचर्या”
राजकुमार बडोले फाउंडेशनचा ऐतिहासिक निर्धार
सडक अर्जुनी – राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीने एक ऐतिहासिक धम्मयात्रा — “धम्मचर्या” — दीक्षाभूमी (नागपूर) ते महाबोधी महाविहार, बुद्धगया (बिहार) दरम्यान ५ मे २०२५ रोजी सुरू होत आहे. या यात्रेचे नेतृत्व फाउंडेशनचे अध्यक्ष आणि माजी सामाजिक न्याय मंत्री, विद्यमान आमदार राजकुमार बडोले स्वतः करणार असून, यामागे बौद्ध समाजाच्या पवित्र स्थळाच्या स्वायत्ततेसाठी उभा असलेला एक मजबूत आणि विचारप्रवण लढा आहे.
बुद्धगया हे बौद्ध धर्मीयांचे सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. गौतम बुद्धांना येथेच बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. मात्र, आजही या महत्त्वाच्या जागेवर बौद्ध समुदायाचा तितका अधिकार नाही जितका असावा. या पार्श्वभूमीवर “महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन” गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.
राजकुमार बडोले यांनी याआंदोलनाला पाठिंबा देत, प्रत्यक्ष कृतीद्वारे एका विशाल जनप्रवासाच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला आहे. “धम्मचर्या” ही केवळ एक यात्रा नसून, ही एक सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि राजकीय जाणीव असलेली चळवळ ठरणार आहे.
यामध्ये महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध भिक्खू, धम्म अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मार्गात विविध ठिकाणी धम्मसभा, जनजागृती कार्यक्रम आणि बौद्ध विचारधारेला समर्पित उपक्रम आयोजित केले जातील.
राजकुमार बडोले यांनी याआधीही अनेक सामाजिक विषयांवर स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली आहे. बुद्धगया प्रश्नावरही त्यांनी राज्यसभेत, विधानसभेत आणि विविध व्यासपीठांवर आवाज उठवला आहे. परंतु या वेळी ते प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून एक ऐतिहासिक पाऊल उचलत आहेत.
या यात्रेची उद्दिष्टे:
1. महाबोधी महाविहारवरील व्यवस्थापन पूर्णतः बौद्ध समाजाकडे सोपवले जावे.
2. बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळांवर राजकीय किंवा प्रशासकीय हस्तक्षेप थांबवावा.
3. नवयुवकांमध्ये बौद्ध विचारधारा अधिक दृढ व्हावी आणि जागृती निर्माण व्हावी.
बोधगया येथील महाबोधी मंदिराच्या व्यवस्थापनावरून बौद्ध धर्मीयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मंदिराच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्वामुळे संपूर्ण जगभरातील बौद्ध धर्मीयांचे ते श्रद्धास्थान आहे. परंतु 1949 साली लागू झालेल्या बौद्ध मंदिर कायद्यामुळे या मंदिराच्या व्यवस्थापनात बौद्धांसोबत हिंदू धर्मीय / इतर धर्मीय सदस्यांचाही समावेश करण्यात आला आहे. याला विरोध म्हणून बौद्ध भिक्षूंनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी शांततामय आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाला आता महाराष्ट्रातूनही ठोस पाठिंबा मिळत आहे. राजकुमार बडोले फाउंडेशनचे अध्यक्ष, माजी समाजकल्याण मंत्री व विद्यमान आमदार इंजिनीयर राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील बौद्ध उपासक-उपासिकांचा जत्था दिनांक 5 मे 2025 रोजी बोधगया येथे जाऊन आंदोलनात सामील होणार आहे. बौद्ध धर्मीयांच्या धार्मिक स्वायत्ततेसाठी हे आंदोलन निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
ही चळवळ आता देशभरातील बौद्ध समाजामध्ये एकतेचा संदेश देत असून, जागतिक बौद्ध समुदायाचं लक्ष भारताकडे वेधत आहे.