बोधगया महाबोधी मंदिर प्रकरणावर राज्यातून आवाज — राजकुमार बडोले फाउंडेशनचा आंदोलनाला पाठिंबा
सडक अर्जुनी / अर्जुनी मोर – बोधगया येथील महाबोधी मंदिराच्या संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी बौद्ध समाजाकडे देण्याच्या मागणीसाठी चाललेल्या आंदोलनाला महाराष्ट्रातूनही प्रखर पाठिंबा मिळत आहे. बुद्धाच्या ज्ञानप्राप्ती स्थळी बौद्ध धर्मीयांचा हक्क सिद्ध करण्यासाठी देशभरातील बौद्ध अनुयायी रस्त्यावर उतरत आहेत.
या पार्श्वभूमीवर राजकुमार बडोले फाउंडेशन तर्फे महाराष्ट्रातील उपासक-उपासिकांचा जत्था दिनांक 5 मे 2025 रोजी बोधगया येथे रवाना झालेला आहे. या जत्थ्याचे नेतृत्व माजी सामाजिक न्याय मंत्री, विद्यमान आमदार व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर राजकुमार बडोले यांनी केले आहे.
हे आंदोलन शांततामय असून, बीटी (बौद्ध मंदिर) अधिनियम 1949 रद्द करावा आणि महाबोधी मंदिराचे सर्वाधिकार बौद्ध समाजाला द्यावेत, अशी आंदोलनाची प्रमुख मागणी आहे.
“महाबोधी मंदिर हे बौद्ध धर्मीयांचे अत्यंत पवित्र स्थान आहे. त्याच्या व्यवस्थापनात बौद्धांचा पूर्ण अधिकार असणे आवश्यक आहे. हे केवळ व्यवस्थापनाचे नव्हे तर अस्तित्वाचे आंदोलन आहे,” — इंजि. राजकुमार बडोले