राजकीय आकसाच्या पार्श्वभूमीवर केलेले आरोप खोटे आहेत?! लवकरच पत्र परिषद घेणार? – हर्ष मोदी
सडक अर्जुनी – हर्ष मोदी यांनी त्यांच्या व्हॉट्सॲप सोशल मिडिया ग्रुप वर सध्या एक लेख प्रकाशित केला आहे. त्यांनी लेखात लिहिले आहे की,
” सध्या माझ्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णतः खोटे, निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत. कोणतेही तथ्य किंवा पुरावे नसताना अशा पद्धतीने आरोप लावणे ही केवळ लोकांची दिशाभूल करण्याची हताश प्रयत्न आहेत.
या आरोपांमागे कोणाचे हितसंबंध दडले आहेत, हे जनतेने ओळखले पाहिजे. यामागील खरा “सूत्रधार” कोण आहे, हे शोधणे आता वेळेची गरज बनली आहे.

माझ्या कार्यकाळात ग्राम सौंदडमध्ये पाणीपुरवठा, रस्ते-विकास, वीजसुविधा, स्वच्छता मोहीम, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी उपक्रम अशा विविध क्षेत्रांत ठोस आणि परिणामकारक कामं पार पाडली आहेत. ही कामे आजही जनतेच्या विश्वासाने सुरू आहेत आणि भविष्यातही न थांबता सुरू राहतील. मी जनतेच्या प्रेमावर, माझ्या प्रामाणिक कामगिरीवर आणि कार्यशैलीवर विश्वास ठेवतो. म्हणूनच अशा खोट्या आरोपांना फारसे महत्त्व देण्याची गरज वाटत नाही.
या अपप्रचारांमुळे मी विचलित होणार नाही. उलट, हे आरोप माझ्या विकासयात्रेच्या यशाची जाणीव करून देणारे ठरतात. मी यांना शुभेच्छा देतो—कारण लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, पण त्याचबरोबर उत्तरदायित्व देखील असावं लागतं.
मी लवकरच पत्रकार परिषद घेणार असून त्या माध्यमातून सर्व अधिकृत कागदपत्रे, निधीवाटपाचे तपशील आणि कामांची पारदर्शक माहिती जनतेसमोर ठेवण्यात येईल.”
अशा प्रकारचा लेख सध्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आता मात्र सरपंच हर्ष मोदी केव्हा पत्रकार परिषद घेतात आणि विरोधकांना काय उत्तरे देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
