गोंदिया जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित
•नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित
•यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे- जिल्हाधिकारी प्रजित नायर
गोंदिया : महाराष्ट्र राज्यात 4 नोव्हेंबर 2025 रोजी नगरपरिषद व नगरपंचायतीकरीता सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागु झाली असून सर्वसंबंधित यंत्रणांनी निवडणुकीच्या जाहीर झालेल्या कालावधी दरम्यान आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करुन निवडणूक सुलभरित्या पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मानसी पाटील व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदिप बोरकर उपस्थित होते. 
श्री. नायर पुढे म्हणाले, जिल्ह्यात एकूण 1 लाख 65 हजार 881 मतदार असून ते मतदानाचा हक्क बजावतील. संपूर्ण जिल्ह्यात एकूण 66 निवडणूक प्रभाग असून एकूण 209 मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या निवडणूक प्रक्रियेत 4 निवडणूक निर्णय अधिकारी व 8 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सदर निवडणूक प्रक्रियेची धुरा सांभाळतील. लोकशाहीला बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्याचे आवाहन जिल्ह्यातील महाविद्यालयात स्वीप अंतर्गत कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या निवडणूकी दरम्यान जिल्ह्यात कुठेही आदर्श आचारसंहितेचे भंग होणार नाही यासाठी फ्लाईंग स्पॉट टिम (FST) व व्हिडिओ सर्व्हिलन्स टिम (VST) पथक लावण्यात येणार आहे. मतदान 2 डिसेंबरला होणार असून 3 डिसेंबर 2025 रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे, यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गोंदिया नगरपरिषद मतदार संख्या- पुरुष-59687, महिला-64616 व इतर-8. तिरोडा नगरपरिषद मतदार संख्या- पुरुष-12564, महिला-13542 व इतर-0. गोरेगाव नगरपंचायत मतदार संख्या- पुरुष-4459, महिला-4464 व इतर-0. सालेकसा नगरपंचायत मतदार संख्या- पुरुष-3305, महिला-3506 व इतर-0 आहे.
निवडणूक कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करण्यात आल्याचा दिनांक 31 ऑक्टोबर 2025. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख 6 नोव्हेंबर 2025. नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटरवर भरण्याकरीता उपलब्ध असण्याचा कालावधी दि.10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत. नामनिर्देशनपत्रे स्विकारण्याचा कालावधी दि.10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत. रविवार सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक अपील नसेल तेथे दि.19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत. अपील असल्यास वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत जिल्हा न्यायाधीशाकडे अपील करता येईल.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत. दिनांक 21 ते 25 नोव्हेंबर 2025 अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी, मात्र दिनांक 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 26 नोव्हेंबर 2025. मतदानाचा दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 पर्यंत. मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून. दिनांक 10 डिसेंबर 2025 पुर्वी कलम 19 मधील तरतुदीनुसार शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करणे. अशी माहिती यावेळी पत्रपरिषदेत देण्यात आली.
