Tuesday, December 9, 2025
क्राइमगोंदियागोरेगांव

लाच मागणारा तलाठी ACB च्या जाळ्यात

गोरेगाव : पडीक जमिनीतील काही भुक्षेत्राला अकृषकची परवानगी मिळावी, यासाठी तक्रारकर्त्यांने गोरेगावचे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे रितसर अर्ज केले. दरम्यान सदर प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी लाच मागणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला गोंदिया लाचलुचपत विभागाने जाळ्यात अडकविले. ही कारवाई  दिनांक (४) ला करण्यात आली. अरविंदकुमार युवराज डहाट (४६) असे लाच मागणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्याचे नाव आहे.

सविस्तर असे की, तक्रारकर्त्यांचे गोरेगाव येथे गट क्रमांक १००४ / ४ मध्ये असलेल्या पडीक जमिनीपैकी ३०५.५० चौरस मीटर जागेला अकृषक परवानगी मिळावी, यासाठी गोरेगाव साझा कार्यालयात अर्ज केले. दरम्यान ग्राम महसूल अधिकारी अरविंदकुमार डहाट यांनी चौकशी अहवाल तहसील कार्यालयात सादर करण्यासाठी तक्रारकर्त्याला १५ हजाराची लाच मागितली. लाच देण्याची मुळीस इच्छा नसल्याने तक्रारदाराने गोंदिया लाचलुचपत विभागाकडे २७ ऑक्टोबर रोजी तक्रार केली. तक्रारीची शहनिशा करण्यात आली.पडताळणी दरम्यान ग्राम महसूल अधिकारी डहाट यांनी तडजोडी अंती १४ हजार रूपये लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुरूप ठरल्या प्रमाणे सापळा रचला. मात्र तक्रार कर्त्यावर आरोपीला संशय बाळगल्याने त्याने सापळा दरम्यान लाच स्विकारली नाही. तसेच तो वडिलाला घेवून येतो, असे बोलून निघून गेला. परिणामी लाचलुचपत विभागाचे अधिकारी, कर्मचारी कार्यवाही विनाच रिकामी हाती परतले. त्यामुळे तक्रारकर्त्याने आरोपी तलाठी डहाट याला संशय आला असून तो कार्यालयात हजर राहत नाही. तसेच लाच स्विकारण्यासही नकार असल्याची माहिती लाचलुचपत विभागाला दिली.

यावरून काल लाच मागत असल्याच्या कारणा वरून ग्राम महसूल अधिकारी अरविंदकुमार युवराज डहाट याला ताब्यात घेतले. तसेच गोरेगाव पोलिस स्टेशनला आरोपी विरूद्ध (कलम ७ भ्रष्टाचार परिबंध अधिनियम १९८८) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक उमाकांत उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद राऊत,सपोनि चंद्रकांत करपे, पोहवा संजय बोहरे, मंगेश काहाळकर, अशोक कापसे, संतोष बोपचे, संतोष शेंडे,दीपक भाटबर्वे, पोलीस नाईक संगीता पटले, प्रशांत सोनवणे, कैलास काटकर, रोहिणी डांगे आदिंनी केली.

error: Content is protected !!