Tuesday, December 9, 2025
सड़क अर्जुनी

पाटेकुर्रा गावकऱ्यांनी बांधला श्रमदानातून वनराई बंधारा

सडक अर्जुनी : माझी वसुंधरा अभियान व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत पाटेकुरा येथील बेलापहाडी झुरकुटोला सहवन क्षेत्र जांभळी येथे बुधवारी (ता.१२) गावकरी व वनकर्मचाऱ्यांनी श्रमदानातून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम केले. बंधारा बांधकामासाठी गावकऱ्यांनी   मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

यावेळी सरपंच प्रशांत बालसनवार,उपसरपंच विश्वनाथ टेकाम,गटविकास अधिकारी दीपक खोटेले,प्रादेशिक वन अधिकारी मिथुन तरोणे,एफडीसीएमचे क्षेत्र वनाधिकारी मुलचंद नंदेश्वर, महसूल अधिकारी सचिन कापगते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, तसेच सहवन क्षेत्र जांभळीचे वनकर्मचारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वनराई बंधाऱ्याच्या बांधकामामुळे पर्यावरण संवर्धन आणि जलसंधारणाला चालना मिळेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

वनराई बंधारा म्हणजे काय?

हा एक तात्पुरता आणि कच्च्या बांधकामाचा प्रकार आहे, जो पाणी अडवण्यासाठी नदी-ओहोळांवर बांधला जातो.

यामध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर केला जातो, जसे की माती किंवा वाळूने भरलेल्या बारीक पिशव्या किंवा सिमेंटची रिकामी पोती.

हा बंधारा पाण्याचा साठा करतो, ज्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्तच्या काळातही पाण्याचा वापर करता येतो.

वनराई बंधाऱ्याचे फायदे

यासाठी तांत्रिक ज्ञानाची जास्त गरज नसते, त्यामुळे दोन-चार शेतकरी एकत्र येऊनही हा बंधारा बांधू शकतात.

एकाच नाल्यावर अनेक बंधारे बांधल्यास मोठ्या प्रमाणावर पाणी अडवता येते.

यामुळे भूजल पातळी वाढते आणि परिसरातील विहिरींना पाणी मिळते.

शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी आणि रब्बी पिकांसाठी पाणी उपलब्ध होते.

याद्वारे पाणी अडवून जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय होते आणि उत्पन्नाचे व रोजगाराचे नवीन स्रोत निर्माण होतात.

error: Content is protected !!