स्वप्नांचा पाठलाग करा, यश नक्की मिळेल – आमदार राजकुमार बडोले
सडक अर्जुनी : आदिवासी विकास हायस्कूल व कला, विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय, खजरी/डोंगरगाव येथे आयोजित ‘जगतप्रभात’ वार्षिक स्नेहसंमेलनाच्या सांगता समारोप व बक्षीस वितरण सोहळ्याला आमदार राजकुमार बडोले उपस्थित होते. वर्षभर शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी आयोजित हा कार्यक्रम अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात पार पडला.


विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार राजकुमार बडोले यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. जे विद्यार्थी मोठी स्वप्ने पाहतात आणि त्या स्वप्नांचा पाठपुरावा करतात तेच जीवनात पुढे जातात असे ते म्हणाले. तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा व व्यवसायिक क्षेत्रात संधींचा लाभ घेऊन समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीत मोलाची भर घालावी, असे आवाहनही केले.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागील शिक्षकांचे योगदान त्यांनी विशेषत्वाने गौरवले. शाळेच्या वार्षिक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला असून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थितांची दाद मिळाली.
या सोहळ्याला प्राचार्य डि.के. रहांगडाले, सहसचिव विमलताई रहांगडाले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा छायाताई चौहान, देवरामजी डोये, मनोहरजी डोंगरवार, विलासजी खोटेले, चौधरीजी, चौधरीताई, अविनाशजी मेश्राम तसेच शिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
