Tuesday, December 16, 2025
गोंदिया

नवरदेव लग्न मंडपात जाण्यापूर्वीच थांबविण्यात आला बालविवाह

दामिनी पथक व जिल्हा महिला बाल विकास, इंडियन वेलफेर सोसायटी गोंदिया यांची संयुक्त कारवाई

गोंदिया – दिनांक 14/12/2025 रोजी तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत चांदोरी खुर्द या गावात बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती सायंकाळी 6 वाजता प्राप्त झाली. मा. जिल्हाधिकारी प्रजित नायर, मा. पोलीस अधिक्षक गोरख भामरे, मा.अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे आणि मा.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती रेश्मा आर. मोरे यांचे मार्गदर्शनात दामिनी पथक, जिल्हा बाल संरक्षण कक्ष , चाइल्ड हेल्पलाइन, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया, आणि तिरोडा पोलीस स्टेशन यांची टीम तयार करून प्राप्त माहितीनुसार होऊ घातलेल्या विवाहातील बालक आणि बालिकेचे जन्म प्रमाणपत्र ग्रामसेवक यांचेकडून प्राप्त करून घेण्यात आले. सदर प्रमाणपत्रा नुसार बालकाचे वय पूर्ण नसल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने संपूर्ण टीम चांदोरी या गावात 7.30 वाजता पोहोचले.

रात्री 7.30 वाजता विवाहाची संपूर्ण तयारी झालेली होती. लग्न मंडप सजलेला, डेकोरेशन, डीजे, नाच गाणे, जमलेले वऱ्हाडी, जेवणाची तयारी झालेली होती. काही वेळात लग्न लागणार त्यावेळी दामिनी पथक व महिला बाल विकास विभागाच्या टीमने नवरदेव, नवरी त्यांच्या आई वडील आणि नातेवाईक यांना चौकशी करुन होऊ घातलेल्या विवाहातील बालकांचे वय कमी असून बालविवाह प्रतिबंधक 2006 च्या कायद्यानुसार वय पूर्ण नसल्याने गुन्ह्यास पात्र आहे. बालविवाह केल्यामुळे होणारे दुष्परिणाम बालकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना समजावून सांगण्यात आले. वय पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे हमीपत्र आणि संमती पत्र बालकांच्या आई-वडिलांकडून आणि नातेवाईकांकडून लिहून घेण्यात आले. बालविवाह मुक्त भारत अभियानाची मोहीम सद्या सुरू असून बालविवाह मुक्त गोंदिया करण्यासाठी आपला संकल्प अभियान सुरू आहे याप्रसंगी जमलेल्या वराडी मंडळीची बालविवाह प्रतिबंध शपथ घेण्यात आली.

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांचे नेतृत्वात संपूर्ण कार्यवाही करण्यात आली. यामध्ये दामिनी पथकचे प्रभारी अधिकारी स. पो. नी. मनिषा निकम, मुकेश पटले संरक्षण अधिकारी, इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटीचे जिल्हा समन्वयक (असेस टू जस्टीस ) ज्ञानेश्वर पटले , भागवत सूर्यवंशी, रुपेश चुंडूके, धर्मेंद्र भेलावे, आशिष पुंडे, पूजा डोंगरे, , अमित बेलेकर, , पुर्नाप्रकाश कुथेकर, दीपमाला भालेराव, अमोल पानतावणे, दामिनी पथक गोंदिया चे प्रशांत बन्सोड, वैशाली भांडडकर, , सुवर्णा मडावी , सोनाली टिके व तिरोडा पोलीस स्टेशन बालविवाह थांबविण्याच्या कार्यवाहीमध्ये सहभागी होते…

error: Content is protected !!