पोलिस स्टेशन डूग्गीपार मध्ये गळफास..!
सडक अर्जुनी- तालुक्याला हादरवून टाकणारी घटना सोमवारला घटली आहे. एका व्यक्तीने चक्क पोलिस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
तालुक्यातील डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या पार्किंग परिसरात तेलंगणा राज्यातील एका रुग्णवाहिका चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दिनांक १६ फेब्रुवारी ला सकाळी उघडकीस आली. शिवा असे या चालकाचे नाव असून तो तेलंगणा राज्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, शिवा हा खाजगी रुग्णवाहिकेतून तेलंगणा राज्यातून एक मृतदेह घेऊन नातेवाईकांसह त्यांच्या गावी जात होता. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात आल्यानंतर चालक शिवाने मद्यप्राशन केल्यामुळे मृताच्या नातेवाईकांसोबत त्याचा वाद झाला. हा वाद वाढत गेल्यानंतर संबंधित नातेवाईकांनी डुग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी मृतदेह दुसऱ्या रुग्णवाहिकेत टाकून पुढील प्रवासासाठी रवाना केला.

तर मूळ रुग्णवाहिका आणि चालक शिवा यांना चौकशीसाठी डूग्गीपार पोलीस.ठाण्यात ठेवण्यात आले. दरम्यान, सोमवार १६ ला सकाळी पोलीस स्टेशनच्या पार्किंग परिसरात उभ्या असलेल्या एका पिकअप वाहनाच्या.मागील बाजूस दोरीच्या साहाय्याने शिवाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून पंचनामा करण्यात आला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी वाहन अडविल्यामुळे व झालेल्या कारवाईच्या तणावातून शिवाने आत्महत्या केली की त्यामागे आणखी काही कारणे आहेत, याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास गोंदिया पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सर्व बाबींची बारकाईने चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात एकच खळबळ उडाली असून, मृताच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. तपासा अंती आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात खळबळ मजली आहे.
