Friday, March 13, 2026
गोंदिया

घरगुती गॅसचे गैरवापर होत असल्याचे आढळल्यास कार्यवाहीस तयार रहावे : जिल्हाधिकारी

गोंदिया, दि.12 : सद्यस्थितीत युध्द परिस्थिती लक्षात घेता इंधनाबाबत तुटवडा निर्माण होण्याची तसेच गॅस इंधनाचे दरवाढीची, घरगुती गॅसचा गैरवापर वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने घरगुती गॅसचे गैरवापर होत असल्याचे आढळल्यास कार्यवाहीस तयार रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.

पेट्रोलियम पदार्थांशी निगडीत अनियमिततांना पायबंद घालण्याच्या दृष्टीने तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी तालुका स्तरावर दक्षता/फिरते पथक स्थापन करून गॅस एजन्सीच्या नियमित तपासण्या करण्यात यावे. यामध्ये गॅस एजन्सी नोंदणी, विक्री रजीस्टर, पुरवठा, व्यावसायीक गॅस विक्री बाबत नोंदी, गॅस साठा गोदामे सुरक्षित ठिकाणी असल्याची खात्री करावी. घरगुती गॅसचे वितरण सुरळीत ठेवण्याकरीता आवश्यक त्या उपाययोजना बाबतचे काटेकोर नियोजन करावे. आपल्या कार्यक्षेत्रातील हॉटेल्स, हॉस्पीटल, रेस्टॉरेंट इत्यादी यांनी व्यावसायीक गॅस घेतल्याची खात्री करावी. घरगुती गॅसचे गैरवापर होत असल्याचे आढळल्यास जीवनावश्यक वस्तु अधिनियम 1955 अंतर्गत कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले.

•व्यावसायीक ठिकाणी केलेल्या धाडी सत्रात

15 घरगुती गॅस जप्त ; एकावर गुन्हा दाखल

सद्यस्थितीत युध्द परिस्थिती लक्षात घेता, घरगुती गॅसचा गैरवापर वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अवैध वापर रोखण्याकरीता जिल्हा स्तरावर दक्षता/फिरते पथक स्थापन करून जिल्ह्यातील आठही तालुक्यात व्यावसायीक ठिकाणी म्हणजे कॅटरींग, हॉटेल्स, मंगल कार्यालय, बेकरी, दवाखाने इत्यादी ठिकाणी धाडसत्र सुरु करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील आठ तालुक्यात एकूण 21 गॅस एजन्सी आहेत. यामध्ये गोंदिया तालुक्यातील 1 व तिरोडा तालुक्यातील 5 अशा एकूण 6 व्यावसायीक ठिकाणी फिरते पथकाने धाडी टाकल्या असता गोंदिया तालुक्यातील 7 व तिरोडा तालुक्यातील 8 असे एकूण 15 घरगुती गॅस जप्त करण्यात आले. यामध्ये तिरोडा तालुक्यात एका ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

error: Content is protected !!