Saturday, March 28, 2026
सड़क अर्जुनी

घाटबोरी तेली येथील रेती चोरी करणारा ट्रॅक्टर जप्त, महसूल विभागाची कारवाही

सडक अर्जुनी- सडक अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी/ तेली येथील अवैध गौण खनिज (रेती) चोरी करणाऱ्या ट्रॅक्टर वर महसूल विभागाने कडक कारवाई केली आहे. महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २५ मार्च २०२६ रोजी सकाळी ५.२० वाजता कोदामेडी ते परसोडी रोडवर एक ट्रॅक्टर व ट्रॉली (विना नंबर प्लेट) जप्त करण्यात आली. या वाहनात सुमारे एक ब्रास रेती भरलेली होती.

या कारवाईत हनुमंत आंबेकर (तलाठी, घाटबोरी) व श्रीधर चचाने (तलाठी, परसोडी) यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पथकाने रस्त्यावर गस्त घालताना संशयास्पद ट्रॅक्टरला थांबवले. चालकाकडे रेती वाहतुकीचा कोणताही वैध परवाना किंवा रॉयल्टी भरण्याचा पुरावा न आढळल्याने वाहन आणि त्यातील रेती जप्त करण्यात आली.

वाहन मालक आणि दंड

वाहन मालक: सागर देवानंद वंजारी, राहणार घाटबोरी (तेली), ता. सडक अर्जुनी,

जप्त केलेले: ट्रॅक्टर + ट्रॉली (विना नंबर) व एक ब्रास रेती.

अंदाजे दंड रक्कम: एक लाख २५ हजार रुपये.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या संबंधित कलमांनुसार ही कारवाई करण्यात आली असून, अवैध रेती वाहतुकीसाठी दंड आकारणी व वाहन जप्त करण्यात आला असून ट्रॅक्टर ट्रॉली तहसील कार्यालयात जमा आहे. वाहन मालकावर पुढील फौजदारी कारवाईसाठी संबंधित विभागाकडे सूचना पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पार्श्वभूमी – गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीमुळे शासनाचा महसूल बुडत असल्याने महसूल विभाग सध्या सक्रिय झाला आहे. राज्य सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत प्रलंबित दंड वसुलीचे कडक निर्देश दिले आहेत. अशा प्रकारच्या कारवाया नियमितपणे सुरू असून, नागरिकांनीही अवैध रेती उपसा व वाहतुकीबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे स्थानिक स्तरावर रेती तस्करांना धक्का बसला असून, महसूल संरक्षणासाठी विभागाची ही पावले प्रशंसनीय मानली जात आहेत.

घोगरा घाट वरील अवैध गिट्टी वाहतूक कारवाही चे काय झाले!?.

तर दुसरीकडे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील घोगरा घाट येथे अवैध प्रकारे गीट्टी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर सुध्दा महसूल विभागाने कारवाही केली असल्याचे सांगितले जाते परंतु ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले नाही. तर तो ट्रॅक्टर ,ट्रॅक्टर मालकांच्या घरीच असून संबंधित कारवाही करणाऱ्या अधिकाऱ्याने दोन ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यास पंचनामे करण्यास सांगितले आणि त्या दोन्ही ग्राम महसूल अधिकारी( तलाठी) यांनी पंचनामे केले असल्याचे सूत्र सांगतात. सत्यता काय आहे आणि (प्रेस नोट करिता) हे माहिती करण्यासाठी अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांना आज फोन केला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. तर नागरिकांत चर्चेचा विषय आहे की महसूल विभागाने काही चिरीमिरी घेऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना! ? अशी शंका नागरिक करीत आहेत.

error: Content is protected !!