Monday, March 30, 2026
गोंदिया

बालविवाह थांबविण्यात प्रशासनाला यश

गोंदिया, दि. 29 : तिरोडा येथे होऊ घातलेल्या बालविवाहाची गोपनीय माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तत्काळ कारवाई करून हा विवाह रोखण्यात यश मिळविले.

जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कीर्ती कुमार कटरे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाइन, इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटी गोंदिया तसेच दामिनी पथक यांची संयुक्त टीम तयार करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगा व मुलीचे जन्म प्रमाणपत्र तिरोडा नगरपरिषदेकडून प्राप्त करण्यात आले. त्यानुसार बालिकेचे वय बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 नुसार विवाहासाठी अपुरे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर टीमने तिरोडा येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, नगरसेवक अनिकेत कटरे व वॉर्ड बाल संरक्षण समितीच्या सदस्यांची बैठक घेऊन नियोजित विवाहाबाबत माहिती देण्यात आली. 4 एप्रिल रोजी मंडप पूजन व हळदीचा कार्यक्रम, तर 5 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता विवाह होणार असल्याचे समजले.

त्यानंतर दामिनी पथक, महिला व बाल विकास विभाग आणि इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटीच्या टीमने नवरदेव-नवरी तसेच त्यांच्या पालक व नातेवाईकांशी चर्चा करून बालविवाहाचे कायदेशीर परिणाम आणि दुष्परिणाम समजावून सांगितले. वय पूर्ण होईपर्यंत विवाह न करण्याचे लेखी हमीपत्र पालक व संबंधितांकडून घेण्यात आले.

‘बालविवाह मुक्त भारत’, ‘बालविवाह मुक्त महाराष्ट्र’ आणि ‘बालविवाह मुक्त गोंदिया’ या अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली. नागरिकांना अशा घटना आढळल्यास अंगणवाडी सेविका, जवळचे पोलीस ठाणे, जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा चाइल्ड हेल्पलाइन (टोल फ्री क्रमांक 1098) वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण कार्यवाही पार पडली. सामाजिक कार्यकर्त्या मनीषा चौधरी व दीपमाला भालेराव यांनी बालिकेचे समुपदेशन केले असता तिने पुढील शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. बालिकेला बालकल्याण समिती, गोंदिया समोर सादर करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

या कारवाईत संरक्षण अधिकारी मुकेश पटले, रवींद्र टेंभुर्णे, जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले, बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद चौधरी, चाइल्ड लाईनचे अजय खोब्रागडे तसेच दामिनी पथक व तिरोडा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

error: Content is protected !!