Wednesday, April 1, 2026
क्राइमभंडारा

रेती माफियांचा पत्रकारावर प्राणघातक हल्ला

तिरोडा : तालुक्यातील अवैध रेती उत्खननाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत असून, या गैरप्रकारांविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारावरच प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे तिरोडा तालुक्यात खळबळ उडाली असून पोलीस व महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार अजय नंदागवळी हे आपल्या दुचाकीने जात असताना काही अज्ञात आरोपींनी त्यांना अडवून दुचाकीवरून खाली पाडले. त्यानंतर शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली. “रेती चोरीच्या बातम्या का लावतोस? बातम्या बंद कर, नाहीतर घरात येऊन मारू,” अशा शब्दांत धमकी देत आरोपींनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याचा थेट संबंध अवैध रेती उत्खननाशी असल्याचे स्पष्ट होत आहे. तर पत्रकार अजय नंदागवळी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

तिरोडा तालुक्यातील मांडी, पांजरा, मांडवीपर या भागांत रात्रीच्या अंधारात यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर रेती उपसा सुरू असल्याची माहिती आहे. दिवसा देखील टिपरच्या माध्यमातून अवैध वाहतूक सुरू असल्याचे चित्र दिसून येते. वारंवार तक्रारी व बातम्या प्रसिद्ध होऊनही संबंधित विभागांकडून ठोस कारवाई होत नसल्याने माफियांचे मनोबल वाढले आहे.

या घटनेनंतर पत्रकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक आक्रमक झाले असून आरोपींवर कडक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे. पत्रकारांवरील हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

जर प्रशासनाने या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई केली नाही, तर येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आता या प्रकरणात पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!