Wednesday, April 8, 2026
अर्जुनी मोर

नवेगावबांध तलावावर नौकाविहाराची उद्या ८ एप्रिल पासून सुविधा सुरू

MKM NEWS 24 – डॉ. सुशिल लाडे 

अर्जुनी मोर  (दि. ७ एप्रिल) : गोंदिया जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान येथे पर्यटकांच्या आकर्षणात भर घालणारी आनंदाची बातमी समोर आली आहे. येथील नवेगावबांध तलावावर उद्या, दि. ८ एप्रिलपासून नौकाविहार (Boating) सेवा सुरू होणार आहे.

पर्यटकांना अधिक चांगला आणि रोमांचक अनुभव देण्यासाठी ही सुविधा गोंदिया सिंचन विभागाच्या  माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शिकार बोट, मोटार बोट, बॅटरीवर चालणारी बोट तसेच पेडल बोट अशा विविध प्रकारच्या एकूण सहा बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे.

ही सेवा कंत्राटी पद्धतीने चालविण्यात येणार असून, संबंधित कंत्राट एस. के. इन्फ्रास्ट्रक्चर यांना देण्यात आले आहे. या नवीन सुविधेचे उद्घाटन खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाला पालकमंत्री इंद्रनील नाईक, आमदार राजकुमार बडोले, आमदार डॉ. परिणय फुके तसेच जिल्हाधिकारी मंगेश गोंदवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही नौकाविहार सेवा पूर्णपणे सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने चालविण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना सुरक्षित आणि आनंददायी अनुभव घेता येणार आहे.

नवेगावबांध तलावावरील या नवीन सुविधेमुळे पर्यटनाला चालना मिळणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही याचा मोठा फायदा होणार आहे.

error: Content is protected !!