वाघाच्या हल्ल्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू; गावात शोककळा
MKM NEWS 24 – सुशील लाडे…..
अर्जुनी/मोरगाव (प्रतिनिधी) – गोंदिया वनविभागांतर्गत अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील धाबेटेकडी येथे शुक्रवारी (दि. १० एप्रिल २०२६) सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी घटना घडली. घरासमोर अंगणात खेळत असलेल्या प्रज्वल गोवर्धन मेश्राम (वय ७) या चिमुकल्यावर अचानक वाघाने हल्ला करून त्याला ओढत नेले.
माहितीनुसार, ही घटना सुमारे २५० मीटर अंतरावरील राखीव वनक्षेत्राजवळ घडली. गावकऱ्यांनी तत्काळ धाव घेत मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच मुलाला वाघाच्या तावडीतून सोडवण्यात यश आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एम. बहुरे, वनकर्मचारी तसेच अर्जुनी/मोरगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृत मुलाला पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. 
दरम्यान, वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या RRT पथकाने घटनास्थळी पिंजरे लावले असून ड्रोनच्या सहाय्याने परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जंगल परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असून गस्तही वाढविण्यात आली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृत मुलाच्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
