शाळेच्या जर्जर गेट अंगावर पडल्यामुळे विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
तिरोडा (प्रतिनिधी) : प्राप्त माहितीनुसार, संबंधित शाळेचे मुख्य गेट बऱ्याच काळापासून जर्जर अवस्थेत होते आणि त्याच्या दुरुस्तीचा प्रस्तावही प्रलंबित होता. विद्यार्थ्यांना गेटपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, शनिवार दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर बाहेर पडताना दुर्दैवाने निराली हिने गेटला हात लावून ते ओढले. यावेळी गेट अचानक तिच्यावर कोसळल्याने ती गंभीर जखमी झाली.

घटनेनंतर तिला तातडीने तिरोडा येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी गोंदिया येथे हलविण्यात येत असताना, दुर्दैवाने वाटेतच तिचा मृत्यू झाला. निराली ही अत्यंत हुशार व मेधावी विद्यार्थिनी होती. तिने राज्यस्तरीय प्रज्ञा शोध स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात चौथा क्रमांक पटकावला होता. अलीकडेच पुणे येथे तिचा गौरव करण्यात आला होता.
विशेष म्हणजे, निरालीची आई श्रीमती शुभांगी चौधरी चाफले या त्याच शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
