शारदा राजकुमार बडोले भारत स्त्रिरत्न अवॉर्ड 2024 पुरस्काराने सन्मानित
अर्जुनी मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे ) : अखिल भारतीय मातोश्री जिजाऊ परिवर्तन मराठी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शारदाताई राजकुमार बडोले यांना भारत स्त्रीरत्न अवार्ड 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोर. येथे २८ जानेवारी रोजी आयोजित अखिल भारतीय मातोश्री जिजाऊ मराठी साहित्य संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शिवाजीराव शिंदे व अन्य मान्यवरांच्या हस्ते सौ. शारदाताई राजकुमार बडोले यांना भारत स्त्रीरत्न अवॉर्ड पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे, लुनकरण चितलांगे, बद्रीप्रसाद जायस्वाल, मुकेश जायस्वाल, प्राचार्य डॉ. ईश्वर मोहुर्ले, नगरसेवक दानेश साखरे, डॉ. प्रा. कल्पना सांगोडे, मुन्नाभाई नंदागवळी, जेष्ठ कवियत्री अंजनाबाई खुणे, मातोश्री जिजाऊ फाउंडेशनच्या संस्थापक सचिव प्रा. छाया बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
सौ. शारदाताई बडोले ह्या माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या सुविद्य पत्नी आहेत. पतीच्या राजकीय क्षेत्रा बरोबरच शारदाताई अनेक शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यात कार्यरत असून त्या उत्तम कवी व लेखक आणि गीतकार सुद्धा आहेत. अत्यंत मृदूस्वभावी असलेल्या शारदाताई बडोले यांनी युगंधर नावांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारावरील गाणी लिहून या गाण्याचे अल्बम चे अनावरण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हस्ते सन २०१८ ला प्रदर्शीत झाले आहे.
या गीतांना प्रख्यात गायक शंकर महादेवन, आदर्श शिंदे, बेला शेंडे या महान गायिकांनी गायले आहे. शारदाताईचा “भाव सुमनांची ओंजळ” हा काव्यसंग्रह सुद्धा प्रकाशित झाला आहे, काव्यसंग्रह व गीताच्या माध्यमातून त्यांनी महापुरुषांचे विचार घरोघरी पोहोचविले आहे. आताही काव्यसंग्रह व हिंदी मराठी गीते लिहिण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच सामाजिक कार्यातही नेहमी त्यांचा पुढाकार असतो.
महिला सक्षमीकरणासाठी ही त्यांचे प्रयत्न अविरत सुरू आहेत. अशा कविवर्य व सुमधुर गीतांच्या गीतकार शारदाताई राजकुमार बडोले यांच्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मातोश्री जिजाऊ परिवर्तन मराठी साहित्य परिषदेने त्यांना २०२४ चा भारत स्त्रीरत्न पुरस्कार दिला आहे. शारदा ताईंना हा पुरस्कार प्राप्त झाल्याने अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील व गोंदिया जिल्ह्यातील साहित्यिक, गीतकार, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते व शेकडो महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.