Monday, May 12, 2025
गोंदियाचुनाव

राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक

गोंदिया, दि.19 (जिमाका) :  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची अधिसूचना २० मार्च २०२४ रोजी जारी होणार असून अधिसूचना जारी झाल्याच्या दिवसापासून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी भंडारा यांचे कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारास दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून टेलिकास्ट ब्रॉडकास्ट करण्यापूर्वी, केबल नेटवर्क, केबल वृत्तवाहिन्या, सिनेमा हॉल, सार्वजनिक तसेच खाजगी एफएम चॅनेल्स, रेडिओ, सोशल मिडिया व इंटरनेट संकेतस्थळे, बल्क एसएमएस व रेकॉर्ड केलेले व्हाईस मेसेजेस द्वारे करण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे.

        याबाबत भारत निवडणूक आयोगाने “हँडबुक ऑन मिडिया मॅटर्स फॉर सीईओ ॲन्ड डिईओ” या मार्गदर्शिकेत सविस्तर निर्देश दिले आहेत. ही मार्गदर्शिका आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून या समितीमार्फत जाहिरातीचे प्रमाणीकरण करून देण्यात येईल. प्रमाणीकरण प्रमाणपत्र नसल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना आहेत.

         त्यानुसार सर्व राजकीय जाहिरातींचे माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समितीची पुर्व परवानगी बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राजकीय जाहिराती देतांना जाहिरात संहिता आणि कार्यक्रम संहितेमधील बाबींचे पालन करणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला उमेदवार किंवा राजकीय पक्ष यांचा प्रचार करणाऱ्या जाहिराती देता येणार नाहीत. त्याचप्रमाणे मुद्रीत माध्यमांद्वारे मतदान आणि त्यापूर्वीच्या दिवशी प्रकाशित करावयाच्या जाहिरातीचे प्रमाणीकरणही आवश्यक आहे. अशा जाहिराती बाबतचे अर्ज जाहिरात प्रकाशनाच्या दोन दिवस अगोदर समितीकडे सादर करावे लागतील.

         वैयक्तिक ब्लॉग, संकेतस्थळ, समाजमाध्यमावरील पोस्टसाठी पूर्व प्रमाणिकरण आवश्यक नाही. तथापि आदर्श आचारसंहितेचा भंग होता कामा नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार सर्टिफिकेशनसाठी सार्वजनिक ठिकाणचे दृकश्राव्य माध्यम आणि इंटरनेटवरील मजकुराचाही समावेश आहे. या पत्रानुसार प्रत्येक राष्ट्रीय पक्ष, उमेदवाराने किंवा प्रतिनिधीने जाहिरात प्रसारित होण्याच्या तीन दिवस अगोदर दोन प्रतीत स्वाक्षरी केलेल्या संहितेसह (स्क्रिप्ट) समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावरून जाहिरात प्रमाणिकरण झाली असल्यास परत नव्याने प्रमाणिकरण करण्याची गरज नाही, मात्र प्राप्त पत्राची प्रत सादर करावी लागेल.

जाहिरात प्रमाणिकरणाबाबत राजकीय पक्ष व त्यांच्या प्रतिनिधींनी माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समितीला लेखी स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे. अर्जाचा नमूना समितीकडे उपलब्ध आहे. विहित नमुन्यातच अर्ज सादर करावा. पूर्व प्रमाणिकरण नसल्यास आयोगाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी खबरदारी घ्यावी.

–         प्रजित नायर, जिल्हाधिकारी गोंदिया

error: Content is protected !!