Saturday, May 17, 2025
गोंदिया

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नवीन वाघीण दाखल

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नवीन वाघीण दाखल

  • व्याघ्र संवर्धन स्थांनातरण दुसरा टप्पा

         गोंदिया, दि.12 : वाघाचे संवर्धन स्थानांतरणाच्या (Tiger Conservation Translocation) उपक्रमाअंतर्गत नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात एकुण 4 ते 5 मादा वाघीणींना नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात स्थानांतरीत करणे प्रस्तावित होते. पहिल्या टप्यात 20 मे 2023 रोजी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात 2 वाघीणींना निसर्गमुक्त करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी एका मादा वाघीणीला (NT-3) नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात निसर्गमुक्त करण्यात आले आहे.

         डॉ. जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर व नंदकिशोर काळे, उपसंचालक, (कोअर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांचे नेतृत्वाखाली 10 एप्रिल 2024 रोजी एक मादा वाघीण ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातून ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची चमूचे सहाय्याने ट्राक्युलाइज करून जेरबंद करण्यात आली. जेरबंद वाघीणीची वैद्यकीय तपासणी करुन सनियंत्रणकरीता 10 एप्रिल 2024 रोजी डॉ. रविकांत खोब्रागडे, पशु वैद्यकिय अधिकारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व त्यांची चमू तसेच भारतीय वन्यजीव संस्थानाचे कनिष्ठ संशोधकांचे सहकार्याने सॅटेलाईट जी.पी.एस. कॉलर (Satellite GPS collar) बसविण्यात आली. सदरहू वाघीणीला पशुवैद्यकिय तपासणी करुन 11 एप्रिल 2024 रोजी विशेष वाहनाने नागझिरा वन्यजीव अभयारण्य येथे आणण्यात आले. 11 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी डॉ. प्रविण चव्हाण, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पुर्व नागपूर यांचे हस्ते सदर मादा वाघीणीला (NT-3) नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात निसर्गमुक्त करण्यात आले.

          वाघाचे स्थानांतरण उपक्रम माहिप गुप्ता प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, डॉ. जितेंद्र रामगावकर मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, जयरामेगौडा आर. उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली होत असून सदरहू कार्यक्रमात प्रमोदकुमार पंचभाई उपवनसंरक्षक, वन विभाग गोंदिया तथा क्षेत्रसंचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया (अतिरिक्त कार्यभार), राहूल गवई उपवनसंरक्षक, वन विभाग भंडारा, नंदकिशोर काळे उपसंचालक (कोअर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, पवन जेफ उपसंचालक नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखिव क्षेत्र साकोली, मानद वन्यजीव रक्षक गोंदिया व भंडारा जिल्हा, पशुवैद्यकिय अधिकारी व जलद बचाव दल (RRT) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, भारतीय वन्यजीव संस्थानाचे कनिष्ठ संशोधक, व्हीएचएफ चमू, विकास भोसले वनपरीक्षेत्र अधिकारी नागझिरा तसेच इतर क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

         वाघिणींना सोडल्यानंतर सॅटेलाईट जीपीएस कॉलर व व्हिएचएफ (Satellite GPS collar व VHF) च्या सहाय्याने वाघिणींचे 24 x 7 सक्रियपणे सनियंत्रण केले जाईल. संपूर्ण सनियंत्रणाचे कार्य हे कमांड आणि कंट्रोल रूम साकोली येथून नियंत्रीत केले जाणार आहे. या एक स्थलांतरीत वाघिणींच्या निरीक्षणानंतर व उर्वरित घटक लक्षात घेऊन इतर मादा वाघांना टप्प्या-टप्प्याने स्थानांतरीत केले जाईल. अशी माहिती उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

error: Content is protected !!