Saturday, August 23, 2025
गोंदिया

रस्ता सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी प्रजित नायर

     गोंदिया, दि.17 : अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यातील अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती करुन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित यंत्रणांनी रस्ते सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले.

        जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेश लभाने, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल धोंगडे, मुख्याधिकारी न.प.तिरोडा राहुल परिहार, वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, मोटार वाहन निरीक्षक सागर पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.डी.जायसवाल व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

        जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. मानवाचा जीव अत्यंत मोलाचा असून रस्त्यांवर होणारे अपघात कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. सध्या जिल्ह्यात 8 अपघात प्रवण स्थळे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यावर असणाऱ्या अपघात प्रवण स्थळांची संख्या कमी करण्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीने त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ज्या-ज्या ठिकाणी अपघात प्रवण स्थळे आहेत त्या ठिकाणचे फोटो घेऊन आतापर्यंत कोणकोणत्या उपाययोजना केल्या आहेत याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यपूर्तता अहवाल त्वरित सादर करावा. दुचाकीवर ट्रीपलशीट प्रवास करणाऱ्यांवर पोलीस विभागाने योग्य ती कारवाई करावी. रस्त्यांवर दिशादर्शक व माहितीदर्शक फलक लावण्यात यावे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहनचालकांना वाहतूक नियमांची माहिती असणे गरजेचे आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करावी. विशेषत: शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या मुला-मुलींमध्ये प्रामुख्याने जनजागृती मोहीम राबविण्यात यावी. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग व परिवहन विभागाने समन्वयातून काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

         डुग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत NH-6 नैनपूर, देवरी पोलीस स्टेशन अंतर्गत NH-6 मासुलकसा, तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत NH-753 मुंडीकोटा व सहकार नगर, सालेकसा पोलीस स्टेशन अंतर्गत SH-335 गॅस गोडाऊन, रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत SH-349 भागवतटोला शिवार व SH-275 कटंगीकला शिवार. अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत MSH-11 कुंभीटोला/बाराभाटी. असे एकूण जिल्ह्यात आठ अपघात प्रवण स्थळ आहेत, अशी माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली.

error: Content is protected !!