ऐन रोवणीच्या वेळेसच विहीर खचली,रोवणी करावी कसी! शेतकऱ्याचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र!
सडक अर्जुनी – : सडक अर्जुनी येथील शेतकरी मुत्तजीर मुजफ्फर शेख यांची शेती नैनपूर (डुग्गीपार) शिवारात आहे. शेतातील विहिरीत बोअरवेल (विंधन विहीर)आहे. ही विहीर ५ जुलैला खचली. त्यामध्ये बोअरवेलचा पाइप व पंप दबला आहे. नर्सरीत पऱ्हे आले असून आता रोवणी कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे.
संबंधितांनी पाहणी करून मदत करण्याची मागणी शेतकऱ्यानी निवेदनातून केली आहे. शेतकरी मुत्तजीर मुजफ्फर शेख यांच्या शेतीवर कुटुंबाचा उदर निर्वाह सुरू आहे. २०१२ मध्ये शासकीय योजनेत त्यांच्या शेतात विहीर तयार करण्यात आली होती. त्या विहिरी मध्येच बोअर करण्यात आला होता. शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी मोटारपंप लावण्यात आला. परंतु, ५ जुलैला विहीर खचली. त्यामध्ये बोअरवेलचा पाइप दबला आहे. त्यामुळे शेतात सिंचन करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे नर्सरीत पेरणी केलेले पऱ्हे रोवणी करिता योग्य झाले.
परंतु, विहीर खचल्यामुळे रोवणीची अडचण निर्माण झाली आहे. आता धान रोवणी कशी करावी? असा प्रश्न या शेतकऱ्याला पडला आहे. शासकीय योजनेची विहीर खचल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून मदत करावी असे निवेदन शेतकरी मुत्तजीरशेख यांनी मुख्यमंत्र्यांना तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या मार्फत पाठलिले आहेत.