महाबोधी महाविहार मुक्ती लढा ‘पंचशील ध्वजा’ खाली लढू – राजकुमार बडोले
नागपूर, दि. 10 मे: तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानव मुक्तीसाठी आहेत. महाबोधी महाविहार मुक्ती लढा कोणत्याही जाती किंवा धर्माविरुद्ध नाही, तर हा धम्माचा, मानवतेच्या स्वातंत्र्याचा लढा आहे, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री आमदार राजकुमार बडोले यांनी आज येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअर्स असोसिएशनच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत 20 हून अधिक आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले. या लढ्याला कोणताही राजकीय रंग लागू नये म्हणून पक्षांचे झेंडे गुंडाळून ठेवण्याचा आणि पंचशील ध्वजाखाली एकत्र लढण्याचा निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला.
राजकुमार बडोले म्हणाले, “बुद्धगयेतून मिळालेला अनुभव आणि भंतेंसोबत झालेल्या चर्चांनंतर असा निर्णय घेण्यात आला. सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या भागात एकत्र यावे आणि पंचशील ध्वजाखाली शांततामय लढा उभारावा. नागपूर हे आंदोलनाचे केंद्रबिंदू असेल आणि इतर शहरांमध्येही मोर्चे निघतील. हा लढा आपण सर्वांनी मिळून अधिक बळकट करायचा आहे.”
या आंदोलनात इंदू मीलचा प्रश्न, लंडनमधील बाबासाहेबांचे घर स्मारक करणे, भीमा कोरेगावची जमीन प्रकरण, दीक्षाभूमी-चिचोली-कामठी बुद्ध सर्किट यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. पीएमओ कार्यालयापर्यंत ही मागणी पोहोचली असून 12 मेपर्यंत प्रशासनाने आंदोलनाला परवानगी दिल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.
बैठकीला अरविंद गेडाम, राहुल परूळकर, डॉ. अनिल हिरेखण, डॉ. मिलिंद माने, अरुण गाडे, डॉ. हरिदास गजभिये, भैयाजी खैरकर, राजकुमार बडोले फाऊंडेशनचे राकेश भास्कर, प्रशांत शहारे, हितेश डोंगरे, डॉ. सुशील लाडे, सम्राट भिमटे, प्रफुल्ल कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुढील बैठक लवकरच जाहीर करण्यात येईल.