धान खरेदीच्या उद्दिष्टात होणार वाढ – खासदार प्रफुल पटेल यांच्या पाठपुरावा यश
मुंबई – रब्बी हंगाम २०२४ -२०२५ मध्ये गोंदिया व भंडारा जिल्ह्यात धानाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले असून शासकीय खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धान विक्रीस आणले आहे. मात्र जिल्ह्याला ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्रावरच पडून राहिले असून शेतकरी बिकट स्थितीत सापडले आहेत.त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावरील धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्यात यावे अशी मागणी खासदार श्री प्रफुल पटेल यांना केली होती.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर खासदार श्री प्रफुल पटेल यांनी आज केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री श्री. प्रल्हाद जोशी यांच्याशी सविस्तर चर्चा करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान विक्रीपासून वंचित राहू नये याकरिता धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी केली. या चर्चेत सकारात्मक फलित निघून आगामी एक-दोन दिवसांत धान खरेदीचे उद्दिष्ट वाढणार असल्याची ग्वाही माननीय मंत्र्यांनी दिली. यापूर्वीही खासदार श्री प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्र सरकार मार्फत केंद्र सरकारला उद्दिष्ट वाढीसाठी प्रस्ताव पाठविण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.
शेतकऱ्यांच्या अडचणीची खा. श्री पटेल यांनी घेतली दखल
बराच कालावधी लोटूनही शेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्रांवर पडून राहिल्याने अनेक शेतकऱ्यांना गरजेपाेटी कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना स्वस्त दरात विक्री करावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पाचशे ते सातशे रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. याची खा. श्री प्रफुल पटेल यांनी गांर्भीयाने दखल घेत तातडीने केंद्रीय केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्र्यांची भेट घेवून धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी केली.