सालेकसा तालुक्यात सव्वा कोटीचा धान बोनस घोटाळा,२८ जणांवर गुन्हे दाखल
१ कोटी १३ लाखाचा धान बोनस घोटाळ्याप्रकरणी २८ जणावंर गुन्हा दाखल
सालेकसा तालुक्यातील प्रकार
गोंदिया : पुर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान उत्पादक शेतकरी आहेत. अशातच राईस मिल व त्यापासून आधारित उद्योगही जिल्ह्यात कार्यरत आहेत. मात्र धान खरेदी केंद्रापासून ते राईस मिल चालकांपर्यंतचे साटेलोटे हे सर्वश्रुत आहेत. अशातच सालेकसा तालुक्यातील धान खरेदी सावडा गोंधळ उजागर झाला असून या प्रकरणी २८ संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिणामी यात १ कोटी १४ लाखाचा अपहार झाल्याचे समोर आले आहे.

सविस्तर असे की, शासनाकडून धान उत्पादक शेतकर्यांना दिल्या जाणार्या बोनसचा बोगस शेतकर्यांच्या नावावर व अकृषक जमीन कृषक दाखवून व त्याची दुसर्याच शेतकर्यांच्या नावावर उचल करून देऊन शासनाची १ कोटी १३ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सालेकसा तालुक्यातील तीन धान खरेदी संस्थेच्या एकूण २८ संचालकांवर २४ डिसेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर शासनाने १५ दिवसांपूर्वी याची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. सालेकसा तालुक्यातील मानव बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित रामाटोला पांढरी र.जि.१११० केंद्र पाडुडदौना संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ आरोपी क्र.१ ते ७ यांनी संगनमत करून सरकारी गटाची नोंदणी अकृषक गटाची नोंदणी मूळ शेतकर्याच्या गटांची नोंदणी दुसर्या शेतकर्यांच्या नावाने नोंदविणे, मूळ शेतकर्यांच्या वारसदाराच्या नावाची नोंदणी करणे व अशा प्रकारच्या जमिनीची नोंदणी करून तिसर्याच्या खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम ६३ लाख ७५ हजार २०० रुपयांची उचल करून शासनाची फसवणूक केली. तर सालेकसा सहकारी भात गिरणी संस्था मर्या. सालेकसा र.जि.११३ केंद्र कोटजभोरा संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ आरोपी क्र. ८ ते १७ यांनीसुद्धा अशा प्रकारे नोंदणी करुन ३० लाख ५६ हजार ६०० रुपयांची उचल करून शासनाची फसवणूक केली. तसेच कावेरी शेती साधनसामग्री सहकारी संस्था मर्या. बाम्हणी र.जि.१०९७ केंद्र गिरोला संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ आरोपी क्र. १८ ते २८ यांनी संगनमत करून अशाच प्रकारे प्रोत्साहनपर राशी १९ लाख ५५ हजार २०० रुपयांची उचल करून शासनाची फसवणूक केली आहे. या तिन्ही संस्थांचे पदाधिकारी व संचालक मंडळ आरोपी क्र. १ ते २८ यांनी शासनाची १ कोटी १३ लाख ८६,००० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सालेकसा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक सतीश मदन डोंगरे यांच्या लेखी तक्रारीवरून सादर केलेला चौकशी अहवालावरून २४ डिसेंबर रोजी सालेकसा पोलिस स्टेशन येथे कलम ३१८ (४), ३१६ (२),३३६(३),३४० (२), ३(५) भान्यासं अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोनि. बुराडे करीत आहेत.
