राजकुमार बडोले फाऊंडेशन द्वारे “संवादातून नेतृत्व” कार्यशाळेला उस्फूर्त प्रतिसाद
अर्जुनी मोरगाव – “संवादातून नेतृत्व” कार्यशाळा ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवत आयोजित केलेल्या एकदिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत संवाद कौशल्य, नेतृत्व विकास आणि समाजप्रबोधन यासंदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे ही कार्यशाळा नवेगाव–नागझिरा परिसरातील निसर्गरम्य वातावरणात पार पडली, ज्यामुळे सहभागी युवकांना शिकण्याचा एक वेगळाच अनुभव मिळाला.


या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून धम्मचारी कुमारजीव यांनी सखोल मार्गदर्शन केले. ते त्रिरत्न बौद्ध महासंघाशी संलग्न असून बोरधरण, वर्धा येथील हू एन त्संग शिबिर केंद्राचे प्रमुख आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ते धम्म साधना आणि समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत. तसेच ते जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या नॉनव्हायोलंट कम्युनिकेशन (NVC), अमेरिका या संस्थेचे प्रमाणित प्रशिक्षक आहेत. 
धम्मचारी कुमारजीव यांनी आपल्या मार्गदर्शनात संवादाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की प्रभावी संवाद हा केवळ बोलण्यापुरता मर्यादित नसून तो समजून घेण्याची आणि संवेदनशीलतेने प्रतिक्रिया देण्याची प्रक्रिया आहे. समाजात शांतता, सहकार्य आणि परस्पर समज वाढवण्यासाठी नॉनव्हायोलंट कम्युनिकेशनची पद्धत अत्यंत प्रभावी ठरू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. सहभागी युवकांनी या सत्रात विविध संवाद तंत्रे आणि नेतृत्व कौशल्ये प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे शिकली.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. जिल्हा परिषद सदस्य यशवंत गणवीर, राजहंस ढोक सर, पंचायत समिती सदस्य जालिंदर कापगते, विश्वजीत डोंगरे, राहुल टेंभुर्णे (धम्मचारी), शशिकांत जांभुळकर, डॉ. इंदूभूषण राऊत, प्रशांत शहारे, राकेश भास्कर, डॉ. सुशील लाडे,गौतम साखरे, मिथुन टेंभुर्णे, अॅड. मयूर रामटेके, डीलेश सोनटक्के, हितेश डोंगरे, कुणाल बडोले, भारत शहारे तसेच इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेदरम्यान युवकांना नेतृत्व, संवाद कौशल्य आणि टीमवर्क याविषयी विविध सत्रांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश युवकांमध्ये सकारात्मक विचार, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वाची भावना विकसित करणे हा होता. सहभागी युवकांनी देखील या प्रशिक्षणातून अनेक नवीन गोष्टी शिकल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सांगितले की अशा प्रकारच्या कार्यशाळा पुढेही नियमितपणे आयोजित केल्या जाणार असून समाजात जागरूक, संवेदनशील आणि नेतृत्वगुण असलेले युवक तयार करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल.
