गोमांस विक्रीप्रकरणी डूग्गीपार पोलिसांची कारवाई , ४० किलो गोमांस जप्त
सडक अर्जुनी : गोमांसाची अवैध विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर डूग्गीपार पोलिसांनी कारवाई करून ४० किलो कापलेले गोमांस व इतर साहित्य असा एकूण ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी डूग्गीपार पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, मौजा घोटी (डव्वा), ता. सडक अर्जुनी येथील प्रकाश तुळशीराम सोनवाने हा आपल्या घरी गोमांसाची विक्री करीत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सोनवाने यांच्या घरी धाड टाकली.

यावेळी घराच्या बाजूला असलेल्या खोलीत अवैधरित्या गोमांसाची विक्री करताना तो आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून ४० किलो कापलेले गोमांस, किंमत १५० रुपये प्रति किलोप्रमाणे ६ हजार रुपये, तसेच तराजू व इतर साहित्य ९०० रुपये, असा एकूण ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी आरोपी प्रकाश तुळशीराम सोनवाने याच्याविरुद्ध डूग्गीपार पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जावेद शेख, पोहवा राकेश राऊत, पो.ना. १७०९ मुळे, पोशि. २१५४ देशमुख आणि चापोशी निखिल मेघशाम यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली डूग्गीपार पोलीस करीत आहेत.
