Sunday, August 30, 2026
सड़क अर्जुनी

राष्ट्रीय महामार्गावरील उभे वाहने देत आहेत अपघाताला आमंत्रण

सुशिल लाडे…

•राष्ट्रीय महामार्गावरील उभे वाहने देत आहेत अपघाताला आमंत्रण

•कोहमारा येथील टी-पॉईंटवर जड वाहनांचा बेकायदा ठिय्या; मोठ्या दुर्घटनेनंतरच प्रशासन जागे होणार का?

सडक अर्जुनी : कोलकाता–मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील कोहमारा येथील नवेगावबांध टी-पॉईंट तसेच गोंदियाकडे जाणाऱ्या टी-पॉईंट परिसरात रस्त्याच्या कडेला जड वाहने सर्रास उभी केली जात असल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. वळणाच्या ठिकाणी उभी असलेली ही वाहने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहेत.

राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने वाहतूक सुरू असताना टी-पॉईंटच्या वळणावर जड वाहने उभी राहत असल्यामुळे समोरून येणारे वाहन वाहनचालकांना वेळेत दिसत नाही. परिणामी अचानक समोर आलेल्या वाहनामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हा धोका अधिक गंभीर बनतो.

महामार्गाच्या कडेला वाहन उभे करण्यासंदर्भात वाहतूक नियम असतानाही संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहत असल्याचे चित्र आहे. एखादी मोठी दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिक व वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.

महामार्ग पोलिसांचे दुर्लक्ष का?

राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महामार्ग पोलिसांसह स्थानिक पोलिस विभागाने या गंभीर प्रकाराकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. धोकादायक वळणावर वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नियमित गस्त, दंडात्मक कारवाई तसेच आवश्यक त्या ठिकाणी नो-पार्किंगची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.

नवेगाव बांध टी पॉईंट वर उभी असलेले धोकादायक वाहने

मोठ्या दुर्घटनेची वाट पाहू नका!

कोहमारा येथील दोन्ही टी-पॉईंटवर उभी केली जाणारी जड वाहने तातडीने हटवून संबंधित वाहनचालकांवर नियमाप्रमाणे कारवाई करावी. तसेच या ठिकाणी नियमित पोलिस गस्त वाढवून भविष्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.

महामार्ग पोलिस आणि पोलिस विभागाने आता तरी डोळे उघडून कारवाई करावी; अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न सध्या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

“नवेगाव टी पॉईंट आणि कोहमारा गोंदिया टी पॉईंट वर महामार्गावरील रस्त्याच्या कडेला उभे असलेले वाहने ही मृत्यूचा सापळाच आहे. अनेकदा उभी असलेलं वाहन हे अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण करतात. भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो. पोलिस विभागाने ह्या विषयाला गंभीर घेऊन उपाय योजना करणे आवश्यक आहे.” 

महेश सूर्यवंशी – माजी नगरसेवक नगर पंचायत सडक अर्जुनी,

error: Content is protected !!