Friday, September 4, 2026
सड़क अर्जुनी

सडक अर्जुनी नगरात अल्पवयीन दुचाकीस्वारांचा धुमाकूळ

सुशिल लाडे..

सडक अर्जुनी 4/9/26: सडक अर्जुनी नगरात अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांकडून दुचाकी चालविण्याचे प्रमाण वाढले असून, शेंडा रोड, मुख्य चौक, दुर्गा चौक,कोहमारा मार्ग, तसेच शाळांच्या परिसरात अल्पवयीन दुचाकीस्वारांचा धुमाकूळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः शाळेत जाताना तीन-तीन विद्यार्थी एकाच दुचाकीवर बसून प्रवास करताना दिसत असून, भरधाव वेगाने दुचाकी चालविणे, अचानक कट मारणे तसेच जागेवरूनच वाहन वेगाने उडविण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे विद्यार्थी स्वतःसह इतरांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.

शाळेत जाण्या-येण्याच्या वेळेत मुख्य रस्त्यांवर अल्पवयीन मुले दुचाकी घेऊन फिरताना दिसतात. अनेकदा क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी एकाच दुचाकीवर बसतात. वाहन चालविताना वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने एखाद्या क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पालकांनी मुलांना दुचाकी देऊ नये, काय म्हणतो कायदा..!

भारतात सुधारित मोटार वाहन कायद्याच्या कलम १९९ (ए) (Motor Vehicles Act, Sec 199A) नुसार, जर एखाद्या अल्पवयीन मुलाने (१८ वर्षांखालील) दुचाकी किंवा कोणतेही वाहन चालवले, तर त्यासाठी त्याच्या पालकांना किंवा वाहन मालकाला थेट दोषी धरले जाते. या कायद्यानुसार पालकांसाठी खालीलप्रमाणे कडक शिक्षेची तरतूद आहे. आर्थिक दंड: पालकांना २५,००० रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो.कारावास: पालकांना ३ वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो.वाहनाची नोंदणी रद्द: संबंधित वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) १२ महिन्यांसाठी (१ वर्षासाठी) रद्द केले जाते. मुलावर होणारी कारवाई:नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अल्पवयीन मुलाला वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन परवाना) मिळत नाही.मुलावर ‘जुवेनाईल जस्टिस ॲक्ट’ (Juvenile Justice Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी देणे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. पालकांनी केवळ मुलांच्या हट्टापायी त्यांना दुचाकी देण्याऐवजी त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविल्यास अपघाताचा धोका तर आहेच, शिवाय कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते.

शाळांनीही जनजागृती करावी

ज्या शाळांमधील विद्यार्थी दुचाकी चालविताना आढळतात, त्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, अल्पवयीनांनी वाहन चालविण्याचे कायदेशीर परिणाम आणि रस्ते सुरक्षेबाबत नियमितपणे मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याची गरज आहे.

मोठा अपघात होण्यापूर्वी कारवाईची मागणी

शेंडा रोड, मुख्य चौक, दुर्गा चौक आणि शाळांच्या परिसरात वाहतूक पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबवून अल्पवयीनांकडून दुचाकी चालविण्याच्या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मोठी दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा त्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी देऊ नका, वाहतूक नियम पाळा आणि आपल्या मुलांसह इतरांचेही जीव सुरक्षित ठेवा, असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!