AICWC – सुशिल लाडे यांची विदर्भ कार्याध्यक्षपदी नियुक्ती
•अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद विदर्भ कार्याध्यक्षपदी सुशिल लाडे यांची नियुक्ती.
•जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया, पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया , जिल्हा पुरवठा अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नियुक्तीची माहितीचे पत्र सादर.
सडक अर्जुनी, दि. २० सप्टेंबर : ग्राहकांचे हक्क, हितसंरक्षण आणि ग्राहकांमध्ये त्यांच्या अधिकारांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद, महाराष्ट्र ही ( भारत सरकार/ नीती आयोग द्वारा मान्यता प्राप्त ( रजि. नं . BPT/15533 Nag.), च्या विदर्भ कार्याध्यक्षपदी सुशिल लाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीची माहिती देणारे पत्र दिनांक १८/०९/२०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया, पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया, जिल्हा पुरवठा अधिकारी गोंदिया तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.

‘जागो ग्राहक जागो’ हा संदेश घेऊन परिषदेकडून ग्राहक हक्क व हितसंरक्षणाबाबत जनजागृती, नागरिकांना त्यांच्या अधिकारांची माहिती देणे तसेच विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सकारात्मक उपक्रम राबविले जात असल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
सुशिल लाडे यांच्या नियुक्तीनंतर ग्राहक हित, नागरिकांचे अधिकार, जनजागृती आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध शासकीय विभाग, अधिकारी व नागरिक यांच्यात समन्वय साधून कार्य करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
ग्राहकांची फसवणूक, ग्राहक हक्कांविषयी अपुरी माहिती तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासंदर्भातील अडचणी याबाबत नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी परिषदेमार्फत जनजागृतीपर उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. 
“ग्राहक हा केवळ वस्तू किंवा सेवा घेणारा घटक नसून त्याला कायद्याने विविध अधिकार प्राप्त आहेत. हे अधिकार प्रत्येक नागरिकाला माहिती व्हावेत आणि ग्राहकहिताचे प्रश्न योग्य पद्धतीने संबंधित यंत्रणेसमोर मांडता यावेत, यासाठी सकारात्मक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न राहील,” अशी भूमिका सुशिल लाडे यांनी व्यक्त केली.
