Tuesday, November 10, 2026
क्राइमगोंदिया

गोंदिया एलसीबीची धडाकेबाज कामगिरी; मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

•गोंदिया एलसीबीची धडाकेबाज कामगिरी; मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

•तीन विधिसंघर्षग्रस्त बालकांकडून ५ लाख २५ हजार रुपये किमतीचे ३७ मोबाईल जप्त

गोंदिया, दि. १० नोव्हेंबर २०२६ :

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे मोबाईल दुकानाचे शटर तोडून ३७ अँड्रॉइड मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तीन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले ५ लाख २५ हजार रुपये किमतीचे ३७ विविध कंपन्यांचे अँड्रॉइड मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मोहगाव बुज. येथील सोमेंद्र छगनलाल पटले (वय ३३) यांचे गोरेगाव येथील मोबाईल दुकान आहे. दिनांक ६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १० वाजतापासून ते ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील ३७ अँड्रॉइड मोबाईल फोन चोरी करून नेले. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) व ३३१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घरफोडीच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी सक्रिय झाले.

दिनांक ९ नोव्हेंबर रोजी गोरेगाव व डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना तांत्रिक माहिती व गोपनीय खबऱ्यामार्फत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. मौजा म्हसवानी, तालुका सडक अर्जुनी येथील एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने आपल्या अन्य दोन मित्रांसह मिळून ही चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासादरम्यान संशयित बालक सध्या किन्ही/मोखे, तालुका साकोली, जिल्हा भंडारा येथे असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने किन्ही/मोखे येथे जाऊन तिन्ही संशयित विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मोबाईल चोरीबाबत चौकशी केली असता त्यांनी गोरेगाव येथील मोबाईल दुकानाचे शटर तोडून चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेले मोबाईल एका शालेय दप्तरात लपवून ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी पंचांसमक्ष एका बालकाच्या घरातून दप्तरात ठेवलेले विविध कंपन्यांचे एकूण ३७ अँड्रॉइड मोबाईल हँडसेट, किंमत ५ लाख २५ हजार रुपये, जप्त केले.

या कारवाईमुळे गोरेगाव येथील मोबाईल दुकानातून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गोरेगाव पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या पथकात सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक जंगमवार, पोलीस हवालदार दीक्षितकुमार दमाहे, सुबोधकुमार बिसेन, इंद्रजित बिसेन, तुळशीदास लुटे, भोजराज बहेकार, पोलीस शिपाई छगन विठ्ठले, हंसराज भांडारकर, निखिल मेश्राम, चालक पोलीस शिपाई राम खंदारे तसेच सायबर सेलचे पोलीस शिपाई आकीब काझी व श्रेयश लांबट यांचा सहभाग होता.