१३ लाखांची सुपारी देऊन वर्षा तुरकर यांच्या हत्येचा कट; प्रेमसंबंधातून रक्तरंजित शेवट ; मित्राच्या पत्नीने रचल्याचा पोलिसांचा दावा; पत्नीसह चार आरोपी अटकेत, दोघे फरार
गोंदिया : जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोंडराणी गावाजवळील जंगलात झालेल्या वर्षा तुरकर (वय ३५) यांच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून तब्बल १३ लाख रुपयांची सुपारी देऊन या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. मृत महिलेचा मित्र नितेश अग्रवाल याच्या पत्नीने कथितरीत्या सहकाऱ्यांच्या मदतीने हा कट रचल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात संबंधित पत्नीसह चार आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य दोन आरोपी फरार आहेत.

प्राप्त माहितीनुसार, वर्षा धुरनलाल तुरकर (३५), रा. धानोरी, जिल्हा पुणे, या दिवाळीच्या सुट्टीनिमित्त आपल्या माहेरी मौजा किन्ही, तहसील खैरलांजी, जिल्हा बालाघाट येथे आल्या होत्या. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी त्या गोंदिया येथील आपला मित्र नितेश अग्रवाल याच्यासोबत तिरोडा येथे गेल्या होत्या. तेथून परत येताना दोघेही बोंडराणी गावातील शिवमंदिराजवळील जंगल परिसरात थांबले होते. दरम्यान, सायंकाळी सुमारे ५.३० ते ६ वाजताच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी वर्षा यांच्या पोटावर व पाठीवर चाकूने सपासप वार करून त्यांची हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
या प्रकरणी तक्रारीवरून दवनीवाडा पोलिसांनी १५ नोव्हेंबर रोजी गुन्हा क्रमांक ५५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांना या हत्याकांडाचा लवकरात लवकर छडा लावण्याचे निर्देश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने सहा स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू केला.
पोलिसांनी गेल्या चार दिवसांत घटनास्थळापासून तिरोडा, खैरलांजी, वारासिवनी, बालाघाट ते गोंदिया या मार्गांवरील सुमारे २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या फुटेजमध्ये तीन संशयित तरुण मोटारसायकलवरून नितेश अग्रवाल यांच्या कारचा पाठलाग करताना दिसून आले. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली.
१९ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी गोंदिया येथील मुरी परिसरातून इमरान करीम शेख (२६), रा. संजयनगर, मुरी याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता या हत्याकांडाच्या कटाचा उलगडा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रेमसंबंधातून हत्येचा कट रचल्याचा आरोप
पोलिसांच्या तपासानुसार, नितेश अग्रवाल आणि वर्षा तुरकर यांच्यात प्रेमसंबंध असल्याने नितेशची पत्नी मोना अग्रवाल ही कथितरीत्या नाराज होती. याच कारणातून तिने घराजवळ राहणाऱ्या कुणाल कुंभलकर याच्या मदतीने वर्षा यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. कुणालने कथितरीत्या कुख्यात गुन्हेगार शाहरुख पठाण याच्याशी संपर्क साधून हत्येसाठी १३ लाख रुपयांची सुपारी निश्चित केली. त्यानंतर शाहरुख पठाण याने आपल्या परिचयातील मुरी येथील इमरान करीम शेख, नलेन ऊर्फ नायलान शेख (२४) आणि क्रिश राऊत (१९) यांच्याकडे हत्येची जबाबदारी सोपविल्याचे तपासात समोर आले आहे.
जीपीएस लोकेशनच्या आधारे आरोपींनी केला कारचा पाठलाग
या हत्याकांडात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. नितेश अग्रवाल यांची कार त्यांच्या पत्नीच्या नावावर नोंदणीकृत होती. या कारमध्ये टोयोटा आय-कनेक्ट ॲपच्या माध्यमातून जीपीएस लोकेशनची सुविधा सुरू होती. आरोपानुसार, नितेश यांच्या पत्नीने ॲपचा आयडी आणि पासवर्ड उपलब्ध करून दिल्यामुळे आरोपींना कारचे लोकेशन ट्रॅक करणे शक्य झाले.
याच जीपीएस लोकेशनच्या आधारे तीन हल्लेखोर नितेश यांच्या कारचा पाठलाग करत बोंडराणी गावातील जंगल परिसरात शिवमंदिराजवळ पोहोचले. तेथे वर्षा यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपींनी या गुन्ह्यातील आपली भूमिका मान्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पत्नीसमवेत चार आरोपी अटकेत; दोघांचा शोध सुरू
या हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत खालील चार आरोपींना अटक केली आहे.
१. इमरान करीम शेख (२६) – रा. संजयनगर, मुरी, गोंदिया.
२. शाहरुख खान फिरोज खान पठाण (३३) – रा. सिंधी कॉलनी, गोंदिया.
३. कुणाल श्यामलाल कुंभलकर (३१) – रा. साई मंदिराजवळ, सिव्हिल लाईन, गोंदिया.
४. मोना नितेश अग्रवाल (४१) – रा. साई मंगलम लॉनसमोर, गोविंदपूर रोड, गोंदिया.
तर नलेन ऊर्फ नायलान शेख आणि क्रिश राऊत हे दोघे आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना पुढील तपासासाठी दवनीवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक अमरदीप खाडे, अभिषेक जंगमवार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये राजू मिश्रा, इंद्रजीत बिसेन, दीक्षितकुमार दमाहे, सोमेंदसिंह तुरकर, रियाज शेख, विठ्ठलप्रसाद ठाकरे, संजय चव्हाण, सुजित हलमारे, शैलेश निनावे, राकेश इंदुरकर, हंसराज भांडारकर, सुनील उहाके, करण बारेवार, निखिल मेश्राम, छगन विठ्ठले, स्मिता तोंडरे, राम खंडारे, विलेश ठाकरे, इमरान सय्यद आणि मुरली पांडे यांच्यासह सायबर पथकाने सहकार्य केले.
