Saturday, July 11, 2026
अर्जुनी मोर

हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

अर्जुनी मोरगाव, – दि. १० जुलै २०२६ : हरित महाराष्ट्र आयोगाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राज्यव्यापी ‘३०० कोटी वृक्ष लागवड’ अभियानाला इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभागात उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत असून पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी मुकाबला आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर आधारित उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे.

या अभियानाच्या अनुषंगाने शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग, अर्जुनी मोर येथे उपविभागीय अभियंता श्री. समीर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र शासनामार्फत सन २०२६ ते २०३१ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी अभियानातून राज्यभर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाणार आहे.

कार्यक्रमास श्री. केतन गि-रेपुंजे (शाखा अभियंता), श्री. सुनीलकुमार राजूत (शाखा अभियंता), कु. करिष्मा जामुळकर (स्था. अ.स.), संतोष शाहारे (क.लि.), श्री. दिलीप शेंडे (क.लि.), मुकेश रोकडे (का.नि.), शुभम रणदिवे (का.नि.), उज्ज्वल बारसागुरकर (मोज.), सुदाम कवासे, राजेंद्र खंडाईत तसेच गुंजन कोहरे यांची उपस्थिती होती.

उपविभागातील प्रत्येक शाखा कार्यालयामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून इटियाडोह प्रकल्प क्षेत्रातील सर्व पाणी वापर संस्थांना मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. पर्यावरण संरक्षण, जलस्रोतांचे संवर्धन आणि हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाची सामूहिक शपथ घेतली. या उपक्रमामुळे परिसरात हरित क्षेत्र वाढण्यास मदत होणार असून पर्यावरण संतुलन राखण्यासही हातभार लागणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

error: Content is protected !!