सडक अर्जुनी येथे २ ऑगस्ट रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’
सुशिल लाडे
सडक अर्जुनी – 29/7/26 : महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकाभिमुख योजना व सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि जनतेच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान ’ अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जन्मदिवस आणि उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे जयंतीचे औचित्य साधून राज्यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 
हा कार्यक्रम सडक अर्जुनी येथे २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार असून, ठिकाण आशीर्वाद लॉन, अर्जुनी (जि. गोंदिया) येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यात
महसूल विभाग, पंचायत समिती, वन विभाग, भूमी अभिलेख, महावितरण, सहकार, महिला व बाल विकास, पशुसंवर्धन, आरटीओ, आरोग्य, कृषी तसेच इतर विविध शासकीय विभागांच्या योजनांचा लाभ या अभियानातून नागरिकांना मिळणार आहे.
महसूल विभागामार्फत श्रावण बाळ योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना, ७/१२ उतारे, वनहक्क प्रकरणे, संजय गांधी निराधार योजनेशी संबंधित सेवा तसेच जिवंत ७/१२ मोहिमेची माहिती देण्यात येणार आहे. पंचायत समितीमार्फत विविध लाभ वितरण, अर्ज स्वीकारणे आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. वन विभागाकडून वन्यप्राण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईविषयी माहिती दिली जाईल.
भूमी अभिलेख विभागामार्फत गावठाण हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना सनद वाटप व मोजणीसंबंधी अर्ज स्वीकारले जातील. नगर विकास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. कृषी विभागाकडून पीक विमा, राष्ट्रीय कृषी विकास योजना व पीएम किसान योजनेची माहिती दिली जाईल.
याशिवाय महावितरणकडून नवीन वीज जोडणी, तक्रार निवारण व मार्गदर्शन, सहकार विभागाकडून शेतकरी कर्जमुक्ती योजनांची माहिती, महिला व बाल विकास विभागाकडून बालसंगोपन योजनेविषयी मार्गदर्शन, पशुसंवर्धन विभागाकडून विविध पशुधन विकास योजनांची माहिती, आरटीओ विभागाकडून वाहन व वाहतूक नियमांविषयी मार्गदर्शन तसेच आरोग्य विभागाकडून आरोग्य तपासणी सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
समाज कल्याण, आदिवासी विकास, एकात्मिक बाल विकास, पोलीस, पोस्ट ऑफिस, बँका, कामगार विभाग, जिल्हा रेशीम कार्यालय, वीज व इतर शासकीय विभागदेखील या अभियानात सहभागी होणार आहेत.
उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा व शासनाच्या विविध योजनांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
