Thursday, August 6, 2026
गोंदिया

घरफोडी करणारा अट्टल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; चार गुन्ह्यांचा उलगडा, १.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया, प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) गोंदिया यांच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यांतील अट्टल चोराला अटक करून चार गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला १ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास अर्जुनी मोरगाव पोलीस करीत आहेत.

पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोंडगावदेवी येथे २८ जुलै २०२६ रोजी झालेल्या घरफोडीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीच्या घराचे कुलूप तोडून चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ३.३६ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी नागपूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने अर्जुनी मोरगाव परिसरातील बोंडगावदेवी, साकोली परिसरातील सानगडी, लाखनी परिसरातील सेलोटी तसेच देसाईगंज परिसरातील वडसा येथे घरफोडी व चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपीकडून रोख २८ हजार रुपये, एक रेडमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल (२५ हजार रुपये) आणि एक होंडा सीबी शाईन मोटारसायकल (६५ हजार रुपये) असा एकूण १.२८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. आरोपीला पुढील तपासासाठी अर्जुनी मोरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

error: Content is protected !!