Tuesday, October 27, 2026
अर्जुनी मोरदेवरी

महागाव येथे अवैध दारूविक्रीवर देवरी उपविभागीय पोलिसांची धडक कारवाई

•महागाव येथे अवैध दारूविक्रीवर देवरी उपविभागीय पोलिसांची धडक कारवाई

•देशी व विदेशी दारूसह २९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल

अर्जुनी मोरगाव | प्रतिनिधी – गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महागाव येथे अवैध दारूविक्रीविरोधात देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत देशी व विदेशी दारूच्या साठ्यासह एकूण २९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी महागाव येथे अवैध दारूविक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश तटकरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस पथकासह महागाव येथे जाऊन कारवाई केली.

या कारवाईदरम्यान किशोरसिंग शिवकुमारसिंग पवार (वय ४० वर्षे) याच्याकडून ९० मिली क्षमतेच्या देशी दारूच्या एकूण ५०० बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच परसराम लक्ष्मण जहांगिवार (वय ४० वर्षे, रा. महागाव) याच्या घराची तपासणी केली असता, घराच्या छतावरील प्लास्टिक पिशवीत ९० मिली क्षमतेच्या १६० देशी दारूच्या बाटल्या आणि १८० मिली क्षमतेच्या मॅकडॉवेल्स नंबर वन विदेशी दारूच्या १२ बाटल्या आढळून आल्या.

दोन्ही ठिकाणांहून जप्त करण्यात आलेल्या दारूच्या मुद्देमालाची एकूण किंमत २९ हजार ४०० रुपये असल्याचे पोलीस प्रेस नोटमध्ये नमूद आहे.

या प्रकरणी तक्रारीवरून अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात अप. क्र. ४५६/२०२६ आणि अप. क्र. ४५७/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) व ७७(अ) अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

ही कारवाई गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश तटकरे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक किरण मेश्राम तसेच पोलीस अंमलदार दहिफळे, हर्षे, पेदाम आणि महिला पोलीस शिपाई कविता राठोड यांनी सहभाग घेतला.

अवैध दारूविक्रीविरोधातील या कारवाईमुळे परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.