क्रीडा स्पर्धा प्रतिभावान खेळाडू घडविण्याचे प्रभावी व्यासपीठ – आमदार बडोले
सडक अर्जुनी – ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता आणि क्रीडाकौशल्य दडलेले आहे. अशा प्रतिभावान खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून मिळते. क्रीडा स्पर्धा हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून प्रतिभावान खेळाडू घडविण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे. खेळाच्या माध्यमातून शिस्त, संघभावना, जिद्द आणि खिलाडूवृत्ती विकसित होत असून ग्रामीण भागातूनही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडू शकतात, असे प्रतिपादन अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांनी केले. 
शिवस्वराज प्रतिष्ठान क्रीडा मंडळ, पांढरी /गोंगले यांच्या सौजन्याने ३१ ऑक्टोबर रोजी पांढरी/गोगले येथे आयोजित रात्रकालीन कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
जिल्हा परिषद सदस्य सुधाताई रहांगडाले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी डी. यू. रहांगडाले, माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश भेंडारकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास बागडकर, के. बी. कटरे सर, बिसेन सर, पोलीस पाटील. अनिल मेंढे, माजी उपसरपंच राजू राऊत, के. एम बिसेन सर, सेवा निवृत्त शिक्षक बबलू एन. बिसेन,यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून ग्रामीण भागात आयोजित होणाऱ्या कबड्डीसारख्या क्रीडा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. अशा स्पर्धांमुळे गावागावांत उत्साहाचे आणि सलोख्याचे वातावरण निर्माण होते. युवकांना आपले क्रीडा नैपुण्य सिद्ध करण्याची संधी मिळते. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि सांघिक भावना निर्माण होऊन भविष्यात देशाचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू घडण्यास मदत होते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. संचालन शिक्षक अशोक गावळे यांनी केले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
