Monday, November 23, 2026
सड़क अर्जुनी

भर बाजार चौकातून नगरसेवकाचीच सायकल चोरीला! सडक-अर्जुनीतील CCTV यंत्रणेवर प्रश्नचिन्ह; मग सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय?

नगरसेवक गोपीचंद खेडकर यांची १० हजार ७०० रुपये किमतीची सायकल चोरट्यांनी केली लंपास; घटनास्थळी चार CCTV कॅमेरे असतानाही चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप

सडक-अर्जुनी : शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्च करून नगरपंचायतीने ठिकठिकाणी CCTV कॅमेरे बसविले आहेत. मात्र, या कॅमेऱ्यांचा प्रत्यक्ष उपयोग किती होत आहे, यावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण, चक्क शहराच्या गजबजलेल्या बाजार चौकातून एका नगरसेवकाचीच सायकल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. जेव्हा लोकप्रतिनिधीची मालमत्ता सुरक्षित नाही, तेव्हा सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेची हमी कोण देणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सडक-अर्जुनी येथील प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक गोपीचंद खेडकर यांनी रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी बाजार चौकातील आरओ वॉटर प्लांटजवळ आपली सायकल ठेवली होती. त्यानंतर ते काही कामानिमित्त मार्केटमध्ये गेले असता, अज्ञात चोरट्याने संधी साधून त्यांची सायकल लंपास केली. परत आल्यानंतर सायकल जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरी झालेल्या सायकलची किंमत तब्बल १० हजार ७०० रुपये असल्याचे नगरसेवक गोपीचंद  खेडकर यांनी सांगितले. याप्रकरणी त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली असल्याचे सांगितले जाते.

चार CCTV कॅमेरे असतानाही चोरी कशी?

या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या बाजार चौकातून ही सायकल चोरीला गेली, त्याच परिसरात नगरपंचायतीकडून चार CCTV कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती आहे. शहराच्या सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्चून कॅमेरे बसविले जात असताना, त्यांचा उपयोग नेमका कशासाठी होत आहे? कॅमेरे केवळ खांबांवर शोभेची वस्तू म्हणून लावले आहेत की प्रत्यक्षात गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.

शहरातील काही CCTV कॅमेरे सुरू असून काही बंद अवस्थेत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. जर ही वस्तुस्थिती असेल, तर बंद कॅमेऱ्यांची देखभाल कोण करणार? त्यांची नियमित तपासणी होते का? तसेच बाजार चौकातील चारही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग उपलब्ध आहे का? याची नगरपंचायत प्रशासनाने स्पष्टता देणे गरजेचे आहे.

नगरसेवकच असुरक्षित, मग सामान्य नागरिकांचे काय?

शहरातील बाजारपेठ, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी चोरीसारखी घटना घडणे ही केवळ एका सायकलची चोरी नसून शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर उपस्थित झालेले मोठे प्रश्नचिन्ह आहे. नगरसेवकाची सायकल भर चौकातून चोरीला जाऊ शकते, तर सर्वसामान्य नागरिकांच्या दुचाकी, वाहने आणि मालमत्तेची सुरक्षा कितपत सुरक्षित आहे?

आता या प्रकरणात पोलिस प्रशासनाने परिसरातील CCTV फुटेज तपासून चोरट्याचा शोध घ्यावा, तर नगरपंचायत प्रशासनाने शहरातील सर्व CCTV कॅमेऱ्यांची तातडीने तपासणी करून बंद असलेले कॅमेरे सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रश्न सायकल चोरीचा नाही, तर लाखो रुपये खर्चून उभारलेल्या सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेचा आहे. नगरसेवकाची सायकलच सुरक्षित नसेल, तर सडक-अर्जुनीकरांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची?